प्रवास स्वस्तात होणार..! नागपूर, कोल्हापूूर एक्स्प्रेसला चार जनरल डबे जोडण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:48 IST2025-08-12T18:47:54+5:302025-08-12T18:48:32+5:30
पुणे ते नागपूरदरम्यान रेल्वे तिकीट जनरल १६०, स्लीपर ३८० रुपये आहे. खासगी ट्रॅव्हल्सला दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. अनेक वेळा रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी

प्रवास स्वस्तात होणार..! नागपूर, कोल्हापूूर एक्स्प्रेसला चार जनरल डबे जोडण्यात येणार
पुणे :पुणे विभागातून धावणाऱ्या पुणे-नागपूर आणि कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसला प्रवाशांची संख्या वाढत आहे. यामुळे या रेल्वे गाड्यांना प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार ५ सप्टेंबरपासून चार जनरल डबे जोडण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. तसेच चारशे प्रवासी वाढणार आहेत.
पुण्यातून विदर्भात जाणारी दैनंदिन प्रवासी संख्या जास्त आहे. शिवाय या भागात धावणाऱ्या रेल्वेंची संख्या कमी आहे. त्यामुळे नाइलाजाने प्रवासी खासगी बसमधून प्रवास करतात. पुणे ते नागपूरदरम्यान रेल्वे तिकीट जनरल १६०, स्लीपर ३८० रुपये आहे. खासगी ट्रॅव्हल्सला दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. अनेक वेळा रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. यामुळे या दोन्ही गाड्यांना जनरल डब्यांची संख्या वाढविण्यात यावी, यासाठी वारंवार मागणी होत होती. त्याला आता पूर्णत्व आल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
प्रवास स्वस्तात होणार :
पुण्यातून विदर्भ आणि खान्देशात जाणाऱ्या आणि खानदेशातून पुण्यात येणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या जास्त आहे. अनेक वेळा प्रवाशांना रेल्वेची तिकीट न मिळाल्याने नाइलाजाने खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करण्याची वेळ येत होती. यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागते. आता चार डबे वाढविल्याने किमान ४०० प्रवाशांची सोय होणार आहे.