साडेचार वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला; आईच्या आवाजामुळे बिबट्या भेदरला अन् मुलगा वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 15:14 IST2025-11-26T15:14:18+5:302025-11-26T15:14:49+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून निमगाव, दावडी, रेटवडी या परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेकांच्या घरातून कोंबड्या, कुत्रे, बकऱ्या फस्त झाल्या आहेत

साडेचार वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला; आईच्या आवाजामुळे बिबट्या भेदरला अन् मुलगा वाचला
राजगुरुनगर : निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे एका साडेचार वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले आहे. या चिमुकल्याचे नाव देवांश योगेश गव्हाणे आहे.
निमगाव येथील भगतवस्ती येथे दि. २५ रोजी रात्री ८ वाजता घराबाहेर खेळत असताना देवांश गव्हाणे यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मानेला धरून शंभर फुट फरफटत नेले. दरम्यान, आई बाहेर आली आणि जोरजोराने ओरडायला लागली. तिच्या आवाजामुळे बिबट्या भेदरला आणि तो पळून गेला. मानेला बिबट्याचे दात लागून जखम झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून निमगाव, दावडी, रेटवडी या परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेकांच्या घरातून कोंबड्या, कुत्रे, बकऱ्या फस्त झाल्या आहेत. या परिसरात दिवसाढवळ्याही बिबट्याचे दर्शन होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
बिबट्याची संख्येत अचानक वाढ
पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, जेजुरी, पुरंदर भागात ऊसाची शेती सर्वाधिक आहे. याठिकाणी सध्या ऊसतोड सुरु असल्याने शेतात लपून बसलेले बिबटे बाहेर पडू लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. परंतु दरवर्षी पेक्षा यंदा बिबट्याच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ही वाढ कशामुळे झाली? याबाबत कोणाकडेही उत्तर नाही. प्रशासनाकडून आता बिबटयांना रोखण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. प्रशासनाकडून या तालुक्यांना पिंजरे पुरवले जात आहेत. वनविभागाचे अधिकारीही या भागात तैनात आहे. परंतु बिबट्यांची संख्या कमी होताना दिसत नाहीये.