Pune Metro: दिवसात पावणेचार लाख; गणेश भक्तांमुळे मेट्रो सुसाट, देखावे पाहणाऱ्यांचा पहाटेपर्यंत प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 17:56 IST2025-08-31T17:56:29+5:302025-08-31T17:56:49+5:30
शहराच्या मध्यवर्ती भागातल्या भुयारी मेट्रोमुळे प्रवाशांचा नवा उच्चांक गाठला

Pune Metro: दिवसात पावणेचार लाख; गणेश भक्तांमुळे मेट्रो सुसाट, देखावे पाहणाऱ्यांचा पहाटेपर्यंत प्रवास
पुणे : देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मेट्रो सोयीची ठरत आहे. शनिवारी (दि. ३०) एका दिवसात ३ लाख ६८ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. यामुळे प्रवाशांचा नवा उच्चांक गाठला. यामध्ये सर्वाधिक ५६ हजार प्रवाशांनी मंडई स्थानकावरून प्रवास केला. दि. ३० ऑगस्टपासून मेट्रोने पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवली आहे. पहिल्या दिवशीच मेट्रोतून ३ लाख ६८ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. सोमवारपासून ही गर्दी अधिक वाढणार आहे.
पुणे मेट्रोच्या इतिहासात एका दिवसांत सर्वाधिक प्रवाशांचा नवा उच्चांक शनिवारी गाठला. सध्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू आहे. गेल्या वर्षी गणपती विसर्जनादिवशी उच्चांकी तीन लाख ४६ हजार प्रवाशांनी मेट्रोकडून प्रवास केला होता. यंदा जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे गणपती पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज होता. तो पहिल्याच दिवशी खरा ठरला आहे. मेट्रोने गणेशोत्सवात पहाटे दोनपर्यंत सेवा सुरू ठेवण्यास ३० ऑगस्टपासून सुरू केली. त्याचा फायदा प्रवाशांना झाला आहे. पहिल्या दिवशी मेट्रोतून ३ लाख ६८ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून आले. ही प्रवासी संख्या आतापर्यंतची सर्वाधिक ठरली आहे. महामेट्रोकडून विसर्जनाच्या दिवशी सलग ४१ तास मेट्रो सुरू राहणार आहे. त्यादिवशी मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा गर्दीचा नवा उच्चांक गाठणार आहे.
‘मंडई’ स्थानकावर तुफान
मध्यवर्ती भागात येणाऱ्या भाविकांकडून मंडई मेट्रो स्थानकाला जास्तीचे प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे या स्थानकावरून शनिवारी ५६ हजार १३१ प्रवाशांनी प्रवास केला. कसबा, मंडई ही मेट्रो स्टेशन शहराच्या मध्यवस्तीत गणपती पाहण्यासाठी जवळ पडतात. त्यामुळे प्रवाशांकडून या मेट्रो स्टेशनचा वापर सर्वाधिक केला जात आहे. त्या दृष्टीने मेट्रो प्रशासनाकडून या दोन्ही स्थानकांत सुविधा आणि गर्दी नियंत्रणासाठी नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी पीसीएमसी येथून ४२ हजार आणि स्वारगेट येथून २८ हजार प्रवाशांनी प्रवास केला.
महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवासी संख्या
मेट्रो स्थानक ---- प्रवासी संख्या
मंडई - ५६,१३१
पीसीएमसी - ४२,०९५
रामवाडी - ३१,१८७
स्वारगेट - २८,७७७
पीएमसी - २७,८६४
पुणे स्टेशन - १७,७६८
बोपोडी - १४,९०३
गणपती आणि देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मेट्रो सोयीचे ठरत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. तसेच मंडई मेट्रो स्टेशनवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रणासाठी मेट्रोकडून तयारी केले आहे. नागरिकांनी कसबा स्थानकावर उतरून मध्यवर्ती भागात देखावे पाहण्यासाठी जावे. तर देखावे पाहून झाल्यावर मंडई स्थानकावरून परतीचा प्रवास करावा. जेणेकरून प्रवास करताना सोयीचे होणार आहे. -चंद्रशेखर तांभवेकर, अतिरिक्त महासंचालक (जनसंपर्क) महामेट्रो