foreigner ask to see indian currency ; stole 24 thousand rupees | भारतीय नाेटा पाहण्याच्या बहाण्याने परदेशी नागरिकाने लांबविले २४ हजार रुपये
भारतीय नाेटा पाहण्याच्या बहाण्याने परदेशी नागरिकाने लांबविले २४ हजार रुपये

पुणे : तुर्कीस्तानचे नागरिक असल्याचे सांगून भारतीय चलनी नोटा कशा प्रकारच्या असतात हे पहायचे असल्याचे सांगून ५० हजार रुपयांच्या बंडलमधील हातचलाखी करुन २४ हजार ५०० रुपये काढून घेणाऱ्या इराणी नागरिकास गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने अटक केली आहे.  महंमद शमसाबाद अबोलफझल (वय २८, रा़ तेहरान फार्दीस, इराण) असे त्याचे नाव आहे. तो व त्याची पत्नी रेशमा अहमदी फिरोज सह तो जून २०१९ पासून टुरिस्ट व्हिसावर भारतामध्ये आलेला आहे. इतके दिवस तो दिल्लीत रहात होता. १७ नोव्हेंबर पासून तो पत्नी व मुलासह पुण्यात आला असून ढोले पाटील रोडवरील एका तारांकित हॉटेलमध्ये राहत होता.

याबाबतची माहिती अशी, येरवडा येथील सनसिटी चौकातील मेडिकल दुकानात १८ नोव्हेंबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दोघे पतीपत्नी आले. त्यांनी आपण तुर्कीस्तानचे नागरिक असल्याचे सांगून भारतीय चलनी नोटा कशा प्रकारच्या असतात, हे पहायचे आहे, असे सांगितले. दुकानदाराने त्यांना गल्ल्यातील ५०० व २ हजार रुपयांच्या चलनी नोटा असलेल्या ५० हजार रुपयांचे बंडल दाखविले. त्याने बंडल हातात घेऊन ते हातळण्याचा बहाणा करुन त्यातील २४ हजार ५०० रुपये काढून घेतले. 

या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यास अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे व उपायुक्त बच्चन सिंह यांनी गुन्हे शाखेच्या युनिट ४ला सांगितला. पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस हवालदार जितेंद्र तुपे, हणुमंत बोराटे यांनी मेडिकल शॉपमधील सीसीटीव्ही फुटेज पाहून त्याच्या अभ्यास करुन अशा प्रकारचे गुन्हे हे इराणी नागरिक करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी इराणी नागरिक पुणे स्टेशन व कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल्समध्ये सीसीटीव्हीच्या आधारे तपासणी सुरु केली. तेव्हा ढोले पाटील रोडवरील एका हॉटेलमध्ये एका इराणी जोडपे रहायला आल्याची माहिती मिळाली. त्यांचे वर्णन सीसीटीव्ही फुटेजशी जुळत असल्याचे दिसून आले. २० नोव्हेंबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हे जोडपे हॉटेलमध्ये जेवणाकरीता दाखल झाले. दुकानातील फुटेजप्रमाणे ते असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्या अंगझडतीत चोरीला गेलेली २४ हजार ५०० रुपये हस्तगत करण्यात आले आहे. महंम्मद अबोलफझल याने यापूर्वी या प्रकारचे गुन्हे केले आहेत का याची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: foreigner ask to see indian currency ; stole 24 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.