अल्पवयीन मुलींचा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय; बेकायदा वास्तव्य, पोलिसांकडून बुधवार पेठेतील घरांची झडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:38 IST2026-02-11T11:37:29+5:302026-02-11T11:38:06+5:30
अंमली पदार्थांचा वापर, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे, तसेच बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य या मुद्द्यांवर पोलिसांनी अनेक संशयितांची कसून चौकशी केली

अल्पवयीन मुलींचा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय; बेकायदा वास्तव्य, पोलिसांकडून बुधवार पेठेतील घरांची झडती
पुणे: पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांनी मध्यरात्री १२ ते ३ यावेळेत कडेकोट नाकाबंदी करत धडक कारवाई केली. बुधवार पेठेतील ५० हून अधिक घरांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली आहे. यावेळी कुंटणखान्यांमध्ये महिला पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात आली. अंमली पदार्थ, अल्पवयीन मुलींचा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय, बेकायदा वास्तव्य यावर पोलिसांनी लक्षकेंद्रित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा राहणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीप्रकरणी कारवाई न केल्यामुळे फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. संबंधित तरुणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देणे तसेच आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला होता. या घटनेनंतर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बुधवारी मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध पथकांचा मोठा ताफा रात्री १२ वाजता बुधवार पेठेत दाखल झाला. परिसरात ये-जा करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली. शुक्रवार पेठ पोलीस चौकी परिसरातील कुंटणखान्यांमध्ये महिला पोलिसांनी महिलांची चौकशी केली. तसेच परिसरात वेश्याकमन साठी आलेल्या लोकांना ताब्यात घेऊन रस्त्यावर बसवलं. अंमली पदार्थांचा वापर, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे, तसेच बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य या मुद्द्यांवर पोलिसांनी अनेक संशयितांची कसून चौकशी केली.