पुण्यात प्रथमच 'जेन झी' मुळे टपाल कार्यालयही उजळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:11 IST2026-01-09T12:10:27+5:302026-01-09T12:11:37+5:30
पुण्यात यातील पहिलेच जेन झी पोस्ट ऑफिस विद्यापीठात सुरू करण्यात येत आहे. दिल्ली, गुजरात, बिहार, आंध्र प्रदेशात अशी टपाल कार्यालये सुरू करण्यात आली आहे.

पुण्यात प्रथमच 'जेन झी' मुळे टपाल कार्यालयही उजळणार
- अमृत देशमुख
पुणे : मराठी साहित्यात रुक्ष, कोरडी, कळकट, मळकट अशा वर्णनाने प्रसिद्ध असणाऱ्या टपाल कार्यालयांनी कधीच ते रूप टाकून दिले. आता तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तरुणाईला फक्त जवळचेच नाही तर प्रेमाचे वाटेल असे ‘जेन झी’ पोस्ट ऑफिस साकारते आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या या नव्या चकचकीत, आरामदायी व पाहताक्षणीच आवडेल अशा या जेन झी पोस्ट ऑफिसचे लवकरच उद्घाटन होणार आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत भारत सरकारच्या टपाल विभाग युवकांपर्यंत अधिक प्रभावी रीतीने पोहोचणे शक्य व्हावे यासाठी आपल्या सर्व सेवांचे आधुनिकीकरण करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून टपाल कार्यालयांचे रूप बदलण्यात येत आहे. पुण्यात यातील पहिलेच जेन झी पोस्ट ऑफिस विद्यापीठात सुरू करण्यात येत आहे. दिल्ली, गुजरात, बिहार, आंध्र प्रदेशात अशी टपाल कार्यालये सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबईनंतर हा बहुमान पुणे शहराला मिळाला आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये...
हे पोस्ट ऑफिस हे पारंपरिक टपाल कार्यालयांपेक्षा वेगळे आणि आधुनिक स्वरूपाचे केंद्र असेल. तरुणांना त्यातही प्रामुख्याने तंत्रज्ञानाशी जोडल्या गेलेल्या नव्या पिढीला आकर्षित करेल असेच त्याचे डिझाईन व आतील सुविधाही आहेत.
तिथे विनामूल्य वाय-फाय सुविधा असलेला स्वतंत्र कक्ष असेल. कॅफेटेरिया शैलीतील बैठक व्यवस्था आणि छोटे वाचनालय असणार आहे. त्याशिवाय समर्पित संगीत कक्ष, पार्सल आणि लॉजिस्टिक्स आणि सेवांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी माहितीपूर्ण फलक असतील.
विक्रीसाठी विशेष वस्तू
निवडक टपाल तिकीट संग्रह संबंधित पूरक वस्तू, पूर्णपणे डिजिटल क्यूआर आधारित सेवा वितरण, आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याची सुविधा, टपाल कार्यालय बचत बँक योजनेचे मूल्यांकन आणि मार्गदर्शन, चहा, कॉफी, मोबाईल चार्जिंग पोर्ट, आरामदायी बैठक व्यवस्था, उबदार लाईटिंग याही सुविधा जेन झी पोस्ट ऑफिसमध्ये असतील. माय स्टॅम्प, चित्र पोस्टकार्ड व विविध फिलाटेली वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतील.
खास सवलती
विद्यार्थ्यांना स्पीड पोस्ट सेवांवर १० टक्के, तर बल्क बुकिंगवर ५ टक्के सवलत दिली जाणार. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्वरित त्याला हवी असलेली माहिती मिळेल अशी व्यवस्था असणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा
पोस्ट ऑफिसला सुसज्ज करण्यासोबतच सरकार विद्यार्थ्यांच्या करिअरचाही विचार करत आहे. पोस्ट ऑफिसमधील कामकाजाची माहिती व्हावी, त्याचे ज्ञान मिळावे यासाठी युवकांना जेन झी पोस्ट ऑफिसमध्ये इंटर्नशिप करता येईल. युवा जेन झी ला पोस्ट कामाची समज मिळावी यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये इंटर्नशिप करू शकतात.