८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, चोरटे पकडले; ७ लाखांचे दागिने, कार केली जप्त
By नितीश गोवंडे | Updated: July 2, 2025 19:45 IST2025-07-02T19:45:06+5:302025-07-02T19:45:28+5:30
पोलिसांना माग काढता येऊ नये, म्हणून चोरटे पुण्याबाहेर लवळेपर्यंत लांबवर फिरत राहिले होते

८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, चोरटे पकडले; ७ लाखांचे दागिने, कार केली जप्त
पुणे : सहकुटुंब तुळजापूर, अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले असताना चोरट्यांनी घरफोडी करून ३८ लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. पोलिसांना माग काढता येऊ नये, म्हणून चोरटे पुण्याबाहेर लवळेपर्यंत लांबवर फिरत राहिले, तरीही हडपसर पोलिसांनीपुणे शहर व लवळे परिसरातील सुमारे ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत चोरट्यांना जेरबंद केले. गणेश अर्जुन पुरी (३३, रा. सध्या ग्रीनवुड सोसायटी, मांजरी, मूळ रा. लातूर), रवीसिंग शामसिंग कल्याणी (२७, रा. रामटेकडी, हडपसर) आणि निरंजनसिंग भारतसिंग दुधाणी (४४, रा. वांगणी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सोनल निकीत कोद्रे (४०, रा. सेजल गार्डन, हडपसर) या १४ जून रोजी पहाटे पाचच्या सुमारास कुटुंबासह तुळजापूर, अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्याकडील घरकाम करणाऱ्या महिलेने फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले. चोरट्याने घरातील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३८ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्यांचा तपास करत असताना सोसायटीमध्ये असणारे सीसीटीव्ही तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींनी वापरलेल्या कारचे फुटेज पोलिसांनी मिळवले.
पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातील ८०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्या दरम्यान अधिकच्या फुटेजमधून आरोपी हे लवळे भागात गेले असल्याचे दिसून आले. या फुटेजच्या आधारे उपयुक्त माहिती तपास पथकाला मिळाली. त्याआधारे संशयित गणेश पुरी याला पोलिसांनी पकडले. त्याने साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी रविसिंग कल्याणी आणि निरंजनसिंग दुधाणी यांना पकडले.
आरोपींकडून आतापर्यंत २२ लाख ५० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच १४ लाख ५० हजार रुपयांची कार एक मोटारसायकल असा ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलिस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे, नामदेव मारटकर, माऊली चोरमले, माधव हिरवे आणि अमोल जाधव यांनी केली.