अनुयायांनी मोठ्या उत्साहात मानवंदनेसाठी यावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:57 IST2024-12-19T14:56:40+5:302024-12-19T14:57:06+5:30
सिद्धार्थ धेंडे : पेरणे फाटा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम तयारीचा घेतला आढावा

अनुयायांनी मोठ्या उत्साहात मानवंदनेसाठी यावे
कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादनासाठी देशभरातून येणाऱ्या भीमा अनुयायींच्या स्वागतासाठी कोरेगाव भीमा व पेरणे ग्रामस्थ सज्ज असून, या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांनी मनात कोणतीच किंतू भावना घेऊन येऊ नये, असे आवाहन पुण्याचे माजी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व राहुल डंबाळे यांनी सांगितले.
पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम तयारी आढावासाठी बुधवारी पेरणे स्तंभावर बैठक संपन्न झाली. यावेळी पुण्याचे माजी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्यासह कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप ढेरंगे, पेरणेच्या सरपंच उषा दशरथ वाळके, उपसरपंच अक्षय वाळके, माजी सदस्य साईनाथ वाळके, किरण सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
परभणी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२५ विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा व पोलिस प्रशासनाने बारकाईने नियोजन केले असल्याने याठिकाणचे वातावरण उत्साहवर्धक असल्याचे धेंडे यांनी सांगितले. कोरेगाव भीमा व पेरणे ग्रामपंचायतीच्यावतीने अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांचे याठिकाणी स्वागत करण्यात येत असून, ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे व पेरणेच्या सरपंच उषा वाळके यांनी अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांचे आम्ही दरवर्षीप्रमाणे उत्साहात स्वागत करणार असून, या दोन्ही गावांच्या परिसराचा भौगोलिक विकास करण्यावर शासनस्तरासह आंबेडकरी बांधवांनी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
यंदाच्या वर्षी उच्चांकी गर्दी होणार असून, सर्व अनुयायी हे केवळ अभिवादनासाठीच या ठिकाणी येत असल्याने व गेल्या सात वर्षांपासूनच्या नियोजनात स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने आनंदाचे वातावरण आहे. परभणी येथील घटनेचा कोणताही तणाव उत्सवावर नसून मागील वर्षीपेक्षा अधिक दर्जेदार पद्धतीने यंदा उत्सव साजरा होणार आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता मोठ्या संख्येने शौर्य दिन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे डॉ. सिद्धार्थ धेंडे व राहुल डंबाळे यांनी केले.
२०२७ सालच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी मोठा विकास
विजयस्तंभ अभिवादनासाठी १९२७ साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले असल्याने या ऐतिहासिक घटनेला २०२७ साली शंभर वर्षे पूर्ण होत असून, देशभरातून ३० ते ३५ लाखांचा भीम जनसमुदाय याठिकाणी येण्याचा अंदाज आहे, त्यासाठी शासनाच्यावतीने याठिकाणचा विकास आराखडा तयार केला असून, कोरेगाव भीमा व पेरणे गाव व परिसराचा मोठा विकास होणार असल्याचे भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी सांगितले.