पुण्यातून केलं उड्डाण अन् दिल्लीत लँडिंग, 'उदयनराजेंचं' जुळलं भाजपात 'टायमिंग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 22:42 IST2019-09-13T22:42:07+5:302019-09-13T22:42:12+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमेवत जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेही विमानाने दिल्लीला पोहोचले आहेत

पुण्यातून केलं उड्डाण अन् दिल्लीत लँडिंग, 'उदयनराजेंचं' जुळलं भाजपात 'टायमिंग'
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन उदयनराजेंनी संदेश लिहून उद्या म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा प्रवेश सोहळा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर, आज सांयकाळी विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमेवत आज सायंकाळी उदयनराजे विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले होते. रात्री ते दिल्लीत पोहोचले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमेवत जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेही विमानाने दिल्लीला पोहोचले आहेत. रात्री 8 वाजता पुणे विमानतळावरुन हे विमान दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर, दिल्लीला पोहोचल्यानंतर रात्री 9.30 वाजता उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या निवासस्थानी उतरले आहेत. उद्या सकाळी 10 वाजता मोदींच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपात प्रवेश करणार आहेत. याबाबतही उदयनराजेंनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
पुणे विमानतळ येथून दिल्ली ला रवाना.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 13, 2019
यावेळी सोबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन.@Dev_Fadnavispic.twitter.com/2uGrRD7v0l
खासदार उदयनराजे यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीत चर्चा झाल्यानंतर राजेंनी आज आपली भूमिका जाहीर केली आहे. पवार यांच्यासोबतच्या भेटीवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदेही उपस्थित होते. या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी पत्रकारांशी संवाद साधून उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाचे वृत्त नाकारले होते. उदयनराजे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीला आले होते, असे मुंडेंनी सांगितले होते. मात्र, मुंडेंचा आशावाद फोल ठरला असून उदयनराजे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत.