ससून रुग्णालयात पहिली यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया;अत्याधुनिक उपचार आता गरजू रुग्णांसाठीही उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 16:25 IST2025-06-29T16:18:21+5:302025-06-29T16:25:24+5:30
ससून रुग्णालयात पहिल्यांदाच एका तरुण महिलेवर अत्याधुनिक रोबोटिक प्रणालीद्वारे पित्ताशयाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया पूर्णतः सरकारी यंत्रणेद्वारे आणि गरजू रुग्णांसाठी विनामूल्य करण्यात आली

ससून रुग्णालयात पहिली यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया;अत्याधुनिक उपचार आता गरजू रुग्णांसाठीही उपलब्ध
पुणे : बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय इतिहासात एक नवा मैलाचा दगड ठरणारी घटना नुकतीच घडली आहे. ससून रुग्णालयात पहिल्यांदाच एका तरुण महिलेवर अत्याधुनिक रोबोटिक प्रणालीद्वारे पित्ताशयाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया पूर्णतः सरकारी यंत्रणेद्वारे आणि गरजू रुग्णांसाठी विनामूल्य करण्यात आली आहे.
महिला रुग्णास पोटदुखीच्या तक्रारीमुळे ससून रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीत पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये अत्याधुनिक रोबोटिक प्रणालीच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया अत्यंत अचूकतेने व सुरक्षित पद्धतीने पार पडली.
या शस्त्रक्रियेसाठी कुशल वैद्यकीय पथकाची साथ लाभली आहे. या पहिल्या रोबोटिक शस्त्रक्रियेचे नेतृत्व शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. लता भोईर यांनी केले. त्यांच्या सहकार्याने डॉ. आशिष चव्हाण, डॉ. सागर कुर्कुरे आणि डॉ. पुनिमा अग्रवाल यांनी शल्यचिकित्सक म्हणून सहभाग घेतला. शस्त्रक्रियेवेळी भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. नेहा कांबळे, डॉ. सुजित क्षीरसागर आणि डॉ. अनुजा यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच, ऑपरेशन थेटरमध्ये शस्त्रक्रिया परिचारिका प्रमुख राजश्री कानडे, उज्ज्वला गरुड, शमा बांदिसोडे आणि साधना धोमसे यांनी सेवा दिली.
या शस्त्रक्रियेच्या यशामागे मागील काही महिन्यांपासून रुग्णालयात ज्रूरु असलेले प्रशिक्षण आणि नियोजन हे प्रमुख कारण ठरले. डॉक्टर, नर्सेस व शस्त्रक्रिया सहायक यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी ससून रुग्णालयात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सर्जिकल सिम्युलेटरचा प्रभावी वापर करण्यात आला. रोबोटद्वारे शस्त्रक्रिया होण्यासाठी स्वतंत्र आणि अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची उभारणीदेखील करण्यात आली. ससून रुग्णालयात रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित आणखी शस्त्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून, ही सुविधा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास वैद्यकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे : अधिक अचूक आणि सूक्ष्म पद्धतीने शस्त्रक्रिया, पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी वेदना, लवकर बरे होणे आणि रुग्णालयातून त्वरित डिसचार्ज, क्लिष्ट व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित.
खासगी रुग्णालयांमध्ये अशा रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी ३ ते ५ लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र ससून रुग्णालयात तीच सुविधा गरजू रुग्णांना पूर्णतः विनामूल्य दिली जात आहे. आम्ही नेहमीच गरजूंना दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देण्यास कटिबद्ध आहोत.
- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय
रोबोटिक शस्त्रक्रिया हे तंत्रज्ञान सामान्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. कर्करोग, हर्निया यांसारख्या गुंतागुंतीच्या विकारांवर अधिक अचूकतेने उपचार करणे शक्य झाले आहे. विशेषत: सरकारी रुग्णालयात अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा उपचारासाठी उपलब्ध झाली आहे. - डॉ. लता भोईर, विभागप्रमुख शल्य चिकित्साशास्त्र, ससून