पीकविम्यातून पहिली भरपाई जाहीर; १२१९ कोटी रुपये मिळण्यास सुरुवात
By नितीन चौधरी | Updated: April 16, 2026 09:38 IST2026-04-16T09:38:16+5:302026-04-16T09:38:29+5:30
सोयाबीन उत्पादकांना दिलासा; कापूस तुरीसाठी वाट पाहावी लागणार

पीकविम्यातून पहिली भरपाई जाहीर; १२१९ कोटी रुपये मिळण्यास सुरुवात
पुणे : गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यानुसार पंतप्रधान पीकविमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिकेवगळता अन्य पिकांसाठी १ हजार २१९ कोटी रुपयांची भरपाई मान्य केली आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे, तर दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकांची नुकसानभरपाई येत्या काही दिवसांत मिळेल. त्यामुळे या रकमेत आणखी वाढ होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सर्वाधिक ८१३ कोटी रुपयांची भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे.
गेल्यावर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सबंध खरिपात तब्बल ९८ लाख ४३ हजार ८२३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेतून हेक्टरी १७ हजार रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पीकविमा योजनेतून देण्यात येणारी रक्कम ही पीक कापणी प्रयोगांवर आधारित आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे १२ हजार महसूल मंडळांमधील पिकांच्या उत्पादनाची सरासरी काढून त्याची माहिती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर टाकण्यात आली. शेतकऱ्यांचे आलेले उत्पादन कमी असल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येत आहे.
या १२ हजार महसूल मंडळांपैकी सुमारे साडेसात हजार मंडळांची नुकसानभरपाईची माहिती अंतिम झाली. त्याला केंद्र सरकारने तसेच विमा कंपन्यांनी सहमती दर्शविल्यानंतर नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कापूस आणि तूर या पिकांच्या काढणीचा हंगाम फेब्रुवारीअखेरपर्यंत असल्याने या उर्वरित पाच हजार मंडळांची माहिती येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे.
साडेसात हजार मंडळांमधील नुकसानभरपाई निश्चित झाल्यानंतर ३१ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना १ हजार २१९ कोटी ७८ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. नुकसानभरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचा समावेश आहे. राज्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाखाली सुमारे ५८ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील सुमारे ३५ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचा विमा उतरविण्यात आला होता.
नुकसानभरपाईची मदत जिल्हानिहाय (आकडे लाखांत)
अहिल्यानगर ११,८३५.०४
नाशिक ८७८.७८
चंद्रपूर २६०.५०
सोलापूर ६८४.०६
जळगाव १०६.९५
सातारा ३६२.१८
परभणी ६३७८.०२
वर्धा ९६१.८२
नागपूर १९४.७०
जालना २०९.३३
गोंदिया ३१०१.७७
कोल्हापूर ०.२७
ठाणे १७९३.८२
रत्नागिरी ७.०८
सिंधुदुर्ग २३.२९
नांदेड ८१,३३७.९७
संभाजीनगर २५.०१
भंडारा ४३३.६८
पालघर १५३४.७७
रायगड १०६.३४
वाशिम १०९.००
बुलढाणा ५६४.९८
सांगली १२७.१४
नंदुरबार २०९.४१
हिंगोली ९८९५.५६
अकोला १५८.९४
धुळे १०३.१५
पुणे १००.०६
अमरावती २५०.२०
गडचिरोली २२४.३६
एकूण १,२१,९७८.१८