कात्रज परिसरात 'एमएनजीएल' च्या पाईपलाईनला आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 14:04 IST2021-04-06T14:04:29+5:302021-04-06T14:04:39+5:30
पुण्यात गेल्या काही दिवसात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ...

कात्रज परिसरात 'एमएनजीएल' च्या पाईपलाईनला आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ
पुणे : पुण्यात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे.शहरात शॉर्ट सर्किट व इतर कारणांमुळे आगीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कात्रजमधील टेल्को कॉलनी येथे एमएनजीएलच्या पाईपलाईनला आज भीषण आग लागली.
कात्रज परिसरात मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास गॅस पाईपलाईनला आग लागली. मात्र या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तत्परतेने घटनास्थळी दाखल झाल्या. व दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या प्रसंगावधानतेमुळे पुढील धोका टळला.
या आगीची माहिती समजताच एमएनजीएलचे पधक घटनास्थळी दाखल झाले होते. ही आग साधारण सकाळी साडेअकरा च्या सुमारास लागली.
अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पाईपलाईनला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमनच्या तीन गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. तब्बल अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझविण्यात यश आलं. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. ज्या रहिवासी इमारतीची ही पाईपलाईन होती, त्या पाईपलाईनच्याच बाजूला एक दुकान देखील होते. पण वेळीच आगेवर नियंत्रण मिळवल्याने आग पसरली नाही."