पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटाजवळील कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू, आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 13:19 IST2021-09-16T13:15:02+5:302021-09-16T13:19:12+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटाजवळील कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू, आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
धायरी : पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड फाटा येथील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून या कंपनीत वाढदिवसाचे डेकोरेशन व पार्टी पॉप फटाके बनविण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. कंपनीत असणाऱ्या काही केमिकलमुळे याठिकाणी सिलेंडर स्फोटासारखे आवाज होत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पुणे व पीएमआरडीए अग्नीशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाले असुन आग विझवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी देखील घटनास्थळी पोहचले आहेत. कंपनीच्या बाहेर बघ्यांनी देखील मोठया प्रमाणावर गर्दी केली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आगीच्या धुराचे लोट लांबवर पसरल्याने परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
त्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना रस्ता मिळण्यास अडचण निर्माण येत होती. हवेली पोलिसांनी बघ्यांना बाजूला करीत अग्निशमन दलाच्या वाहनांना रस्ता करून दिला. या कारखान्याला लागून अनेक कारखाने असल्याने आग पसरल्यास आणखी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आगीत एकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही जण आतमध्ये अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.