तळजाई टेकडीवर पुन्हा आगीच्या झळा, बेपर्वाईमुळे वन संपत्तीची राख, एक एकरचा परिसर जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 09:44 IST2025-02-18T09:44:15+5:302025-02-18T09:44:45+5:30
टेकडीवर आग लागली जाते का? आग लावली जाते? हे वन विभागाने पाहणे गरजेचे आहे

तळजाई टेकडीवर पुन्हा आगीच्या झळा, बेपर्वाईमुळे वन संपत्तीची राख, एक एकरचा परिसर जळून खाक
धनकवडी : तळजाई टेकडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असून बेपर्वाईच्या झळांमुळे वन संपत्तीची राख रांगोळी होत आहे. तळजाई टेकडी वन विभागात सोमवारी (दि. १७) रात्री आठच्या सुमारास आग लागली असून एक एकरचा परिसर जळून खाक झाला तर झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांती पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आग अन्यत्र पसरू न देण्याची काळजी जवानांनी घेतली.
याठिकाणी वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. आठ दिवसांत चार वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून मानवी बेपर्वाईमुळे अनमोल वन संपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. या समस्येला भिडण्याचे आव्हान प्रशासना समोर उभे ठाकले आहे..याठिकाणी आगीच्या घटना पाहता आग लागली जाते का ? लावली जाते? हे वन विभागाने पाहणे गरजेचे आहे आणि आगीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
पुणेकरांसाठी तळजाई टेकडी म्हणजे मोकळा श्वास घेण्यासाठी हाकेच्या अंतरावर असलेले ठिकाण. तळजाई टेकडी ही स्वारगेट पासून जवळ आहे. तळजाई टेकडी हे चांगले पर्यटनस्थळही आहे. आजमितीला तळजाई टेकडीला भेट देणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढत आहे. दरम्यान टेकडीवर बेकायदा वृक्षतोड होत असतानाच दर वर्षी उन्हाळ्यात वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. वनात पत्ते व दारूचे अड्डे तयार झाल्याने वनपरिसरात प्रचंड प्लॅस्टिक व तत्सम कचरा साचत आहे. या गोष्टींचा परिणाम येथील पक्षी व प्राण्यांच्या अस्तित्वावर होऊ लागला आहे.
चैत्र-वैशाखात पारा वाढून उन्हे तापू लागली, कीआग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. नैसर्गिक क्रियांमुळे आगी लागत असल्याचे दावे होत असले, तरी त्यात पूर्ण तथ्य व सत्य नाही. मानवनिर्मित कारणेच प्रामुख्याने आग भडकवतात. वणव्याच्या विस्तवावर स्वत:ची पोळी भाजून घेणारे अनेक असतात. त्यात अवैध उत्खनन व इतर बेकायदा कृत्ये करणाऱ्यांचा प्रमुख भरणा असतो.मानव निर्मित वणव्याच्या भक्ष्यस्थानी हे सर्व काही पडते तेव्हा मोठा नाश होत असतो. - सुशांत ढमढेरे पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, पद्मावती
जंगलात वणवा पेटला की पेटवला, या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळू शकलेले नाही. वने आणि वन्यजीवांसह येणाऱ्या मानवी पिढ्यांचीही आपण होरपळ करून घेत आहोत, हा साधा विचारही मनात न येणे, हे दुर्दैवच. वणव्यामागची खरी श्वापदे शोधली जायला हवीत अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.