‘उच्च सुरक्षा पाटी’ न लावलेल्या २४ लाख वाहनांना दंड ? ढिसाळ नियोजनामुळे थंड प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 09:08 IST2025-05-15T09:07:35+5:302025-05-15T09:08:43+5:30

पुढील दीड महिन्यांत २४ लाख वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्याचे काम होणार का?

Fine for 2.4 million vehicles without high security plates | ‘उच्च सुरक्षा पाटी’ न लावलेल्या २४ लाख वाहनांना दंड ? ढिसाळ नियोजनामुळे थंड प्रतिसाद

‘उच्च सुरक्षा पाटी’ न लावलेल्या २४ लाख वाहनांना दंड ? ढिसाळ नियोजनामुळे थंड प्रतिसाद

- अंबादास गवंडी

पुणे :
न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन विभागाने सर्व वाहनांना ३० जूनपर्यंत उच्च सुरक्षा नंबर पाटी बसविणे अनिवार्य केले आहे; परंतु ढिसाळ नियोजनामुळे वाहनधारकांकडून याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. शिवाय नियोजनाच्या अभावामुळे मंगळवार (दि. १३) रोजी पर्यंत २६ लाख वाहनांपैकी केवळ चार लाख ३७ हजार वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी अर्ज केले असून, एक लाख ७६ हजार वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यात आले आहे. यामुळे पुढील दीड महिन्यांत २४ लाख वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्याचे काम होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून उच्च सुरक्षा पाटी लावण्याचे काम सुरू आहे. पुण्यात एकूण २६ लाख ३३ हजार वाहनांना पाटी लावावी लागणार आहे. आतापर्यंत केवळ ४ लाख ३७ हजार वाहनधारकांनी नोंदणी केले असून, केवळ १ लाख ७६ हजार ८५७ वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यात आले आहे; परंतु पाटी लावण्यासाठी फिटमेंट सेंटरची संख्या कमी आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांनी पाटीसाठी नोंदणी केली आहे, त्यांना वेळेवर नंबरप्लेट बसवून मिळत नाही.

दुसरीकडे वाहनधारक सुरक्षा पाटी लावण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत उरलेल्या २४ लाख वाहनांना पाटी लावण्याचे काम पूर्ण होणार की, पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार? याविषयी अनेक प्रश्न पडले आहेत.

नियमाला हरताळ :

उच्च सुरक्षा पाटी तयार झाल्यावर संबंधित वाहन मालकाच्या गाडीला फिटमेंट सेंटरचालकांकडूून पाटी लावण्यात यावी, असा नियम आहे; परंतु काही फिटमेंट चालक आरसी बुक, चेसिस क्रमांकाची कोणतीही पूर्वतपासणी न करता दुसऱ्या व्यक्तीच्या हातात सुरक्षा पाटी देण्यात येत आहे. त्यामुळे पाटी हरवली किंवा त्याचा गैरवापर झाला, तर याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फिटमेंट सेंटर वाढविण्याकडे दुर्लक्ष

आरटीओकडून फिटमेंट सेंटर वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत, तरीही सेंटरची संख्या काही वाढत नाही. त्यामुळे नागरिकांना खूप दूरच्या तारखा मिळत आहेत. त्यात आता काही सेंटरकडून अचानक काम बंद केले जात असल्याचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. 

असे आहेत उच्च सुरक्षा पाटीचे आकडे :

शहरातील एकूण वाहने - २६ लाख ३३ हजार

पाटीसाठी अर्ज केलेल्यांची संख्या - ४ लाख ३७ हजार ८१७

बसविण्यात आलेल्या पाटी - १ लाख ७६ हजार ८५७

‘एचएसआरपी’ वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठी, चोरी व डुप्लिकेशन रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शिवाय कंपनीला सेंटर वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. आम्ही वाहन मालकांना वारंवार आवाहन करत आहोत की, त्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित या नंबर प्लेट्स बसवून घ्याव्यात. अन्यथा त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. -स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे 

Web Title: Fine for 2.4 million vehicles without high security plates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.