पुण्यातील नवले हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक लूट; "आमची औषधे खरेदी करणार नसाल तर दुसरीकडे जा"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 11:15 AM2022-05-13T11:15:51+5:302022-05-13T11:33:35+5:30

नऱ्हे येथील श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटलमधील प्रकार...

financial loot of patients from shrimati kashibai navale hospital in narhe Pune | पुण्यातील नवले हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक लूट; "आमची औषधे खरेदी करणार नसाल तर दुसरीकडे जा"

पुण्यातील नवले हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक लूट; "आमची औषधे खरेदी करणार नसाल तर दुसरीकडे जा"

googlenewsNext

कल्याणराव आवताडे

धायरी: आमच्या येथून औषधे खरेदी न केल्यास तुम्ही दुसरीकडे उपचार घ्या, असा सरळ इशारा वजा सल्लाही हॉस्पिटल प्रशासन जेव्हा रुग्णांच्या कुटुंबाला दिला जातोय. मात्र अशा स्थितीत पीडित आपल्या होणाऱ्या लुटीविरुद्ध लढूदेखील शकत नाही. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दिलेली औषधे रुग्णालयात घेण्याची सक्ती करू नये, असा नियम असला तरी काहीजण लागेबांधे असलेल्या मेडिकलमधूनच औषध खरेदीसाठी रुग्णांवर सक्ती करत आहेत.

असाच प्रकार नऱ्हे येथील श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमध्ये घडत असल्याचे समोर आले आहे. उपचार करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना प्रिस्क्रिप्शन न देता फक्त रजिस्ट्रेशन नंबर देऊन त्यांच्याच असणाऱ्या मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे.

कसा चालतो प्रकार-

याबाबत एफडीएने अशाप्रकारच्या हॉस्पिटलकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. कमी दरात उपचार केले जात असल्याने अनेक सर्वसामान्य नागरिक येथे उपचारासाठी येतात, मात्र येथे उपचारासाठी दाखल असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना हॉस्पिटलचे डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून न देता साध्या कागदावर फक्त रजिस्ट्रेशन नंबर लिहून देतात.

त्या रजिस्ट्रेशन नंबरवरून त्यांच्याच आवारात असणाऱ्या त्यांच्याच मेडिकलमधील कॉम्प्युटरमध्ये औषधांची यादी दिसते. त्यामुळे नातेवाईकांना बाहेरील मेडिकलमधून सवलतीच्या दरात औषधे मिळत असतानादेखील नाईलाजाने त्यांच्याच मेडिकलमधून ती खरेदी करावी लागत आहे. नऱ्हे येथे सिंहगड इन्स्टिट्यूटचे श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज आहे. वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, वॉर्डबॉय, क्लार्क, स्वच्छता कर्मचारी, असे अडीच हजाराहून अधिक जण येथे काम करतात.

काही खासगी हॉस्पिटलमध्ये असाच प्रकार... 

1. शहरामध्ये काही खासगी हॉस्पिटलकडून त्यांच्याच मेडिकल स्टोअरमध्ये असलेल्या औषधांची खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. बहुतांशी हॉस्पिटलची स्वतःची औषध विक्रीची दुकाने आहेत. त्याच दुकानातून औषध खरेदी करण्याची सक्ती रुग्णांच्या नातेवाईकांकडे केली जाते. प्रसंगी नातेवाईकांनी बाहेरून औषधे आणल्यास त्याच्या दर्जाबाबत कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न नातेवाईकांनाच विचारला जातो.

2. हॉस्पिटलकडून करण्यात येत असलेल्या या दबाव तंत्रामुळे नाईलाजास्तव रुग्णांना हॉस्पिटलकडूनच औषध खरेदी करण्याची वेळ येते. अनेकदा रुग्णांचे नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या माध्यमातून औषधांच्या खरेदीवर इतर मेडिकलमधून काही प्रमाणात सवलत मिळत असते.

3. अशावेळी रुग्ण कमी खर्चामध्ये औषध उपलब्ध होतील त्या ठिकाणी औषध खरेदीला प्राधान्य देतात. इतर मेडिकलमध्ये  दहा टक्के ते चाळीस टक्केहून अधिक सवलत औषधांवर दिली जाते. मात्र, काही हॉस्पिटलच्या दबावतंत्रामुळे नातेवाईकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्या अंतर्गत रुग्णांना रुग्णालयातील औषध दुकानातून औषधे खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून औषधांची खरेदी करू शकतात अशा आशयाचा फलक संबंधित रुग्णालयांनी रुग्णाला दिसेल, अशा दर्शनीय भागात प्रदर्शित करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी लिहून दिलेल्या कोड नंबर ऐवजी प्रिस्क्रिपशनची आग्रही मागणी करावी.

- सुरेश पाटील, सहआयुक्त (औषधे) अन्न व औषधे प्रशासन 


माझ्या पत्नीवर नवले हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. आमच्या येथूनच औषध खरेदी करावी लागतील, अशा सक्तीचा अनुभव मी घेतला आहे. आमच्या येथून औषधे खरेदी न केल्यास तुम्ही दुसरीकडे उपचार घ्या, असा सरळ इशारावजा सल्लाही हॉस्पिटल प्रशासनाने मला दिला. बाहेरील मेडिकल शॉपमध्ये औषध खरेदीवर सवलत मिळत असल्याने सर्वसामान्य रुग्ण याचा विचार करतात. त्यामुळे अशी सक्ती रुग्णांवर केली जाऊ नये.

-  संजय माहुरकर, रुग्णाचे पती

प्रिस्क्रिपशनवरील अक्षरे बाहेरच्या मेडिकल दुकानदारांना न समजल्याने चुकीचे औषधे दिल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे सध्या आमच्याकडे नवीन सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना आम्ही कोड नंबर देत असलो तरी आमच्या येथील मेडिकल मध्ये सवलतीच्या दरात रुग्णांना औषधे देतो आहोत. रुग्णाच्या व हॉस्पिटलच्या सोयीच्या दृष्टीने तातडीने औषधे मिळावीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- डॉ. अरविंद भोरे, संचालक,  श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल

Web Title: financial loot of patients from shrimati kashibai navale hospital in narhe Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.