'सोमेश्वर'मध्ये आर्थिक गैरव्यवहार; लेबर व टाइम ऑफिस विभागातील कर्मचाऱ्यांचे केले निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:08 IST2025-03-01T17:07:47+5:302025-03-01T17:08:37+5:30
सोमेश्वर कारखान्याच्या प्रगतीमध्ये अडसर ठरेल व कारखान्याचे नुकसान होईल...

'सोमेश्वर'मध्ये आर्थिक गैरव्यवहार; लेबर व टाइम ऑफिस विभागातील कर्मचाऱ्यांचे केले निलंबन
सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये रोजंदारी बेसिसवर काम करणारे कर्मचारी व कामगार यांच्या हजेरी नोंदीमध्ये संगनमताने कारखाना प्रशासनाची फसवणूक करून आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कारखान्याचे लेबर व टाइम ऑफिस विभागातील लेबर ऑफिसर, हेड टाइम किपर, टाइम किपर, सर्व क्लार्क्स व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडलेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये घेतला असून, सोबतच या सर्वाविरोधात व लेबर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांवर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, सोमेश्वर कारखान्याच्या प्रगतीमध्ये अडसर ठरेल व कारखान्याचे नुकसान होईल असे काही अधिकारी, कामगारांनी कामकाज केल्याचे निदर्शनास आल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. नियमानुसार कायदेशीर मुद्दे विचारात घेऊन याप्रकरणाची इंडस्ट्रीयल व लेबर न्यायालयामध्ये काम पाहणाऱ्या तज्ज्ञ वकिलांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून सखोल तपास होईल.
कठोर कारवाई होणार
सन २०१५ पासून आजअखेरपर्यंत रोजंदारी कर्मचाऱ्यांची हजेरी नोंद व प्रत्यक्ष दिलेला पगार, झालेले कामकाज आदींची मान्यताप्राप्त सनदी लेखापालामार्फत ऑडिट करून चौकशी करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कठोरपणे कारवाईचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला असून, यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही पुरुषोत्तम जगताप म्हणाले.