Leopard Attack: शिरूर तालुक्यात अजूनही भीतीचे वातावरण; बिबट्याचा शोध सुरू, नऊ शाळा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:15 IST2025-11-04T13:13:37+5:302025-11-04T13:15:02+5:30
बिबट्याच्या भीतीमुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला असून, पिंपरखेड व परिसरातील नऊ शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्या आहेत

Leopard Attack: शिरूर तालुक्यात अजूनही भीतीचे वातावरण; बिबट्याचा शोध सुरू, नऊ शाळा बंद
मलठण (शिरूर) : पिंपरखेड येथील रविवारी झालेल्या बिबट्या हल्ल्यातील मृत्यू आणि त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको, जाळपोळ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी विशेष शार्पशूटर्स पथक पिंपरखेड येथे दाखल झाले असून, डॉ. चंद्रकांत मंडलिक, झुबीन तैहमुर पोस्टवाला आणि विनोद सोनावळे यांच्या नेतृत्वाखालील या तज्ज्ञ टीमने बिबट्याच्या शोधमोहिमेचा प्रारंभ केला आहे.
या पथकाकडे ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्याचा मागोवा घेण्याची साधने आहेत. शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले की, “पिंपरखेड येथे आठ आणि जांबुत येथे चौदा पिंजरे बसवण्यात आले असून, आवश्यकता भासल्यास अजून वाढवले जातील. मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशानुसार बिबट्या दिसताच गोळीबार करण्याचे निर्देश दिले आहेत.” मात्र पकडलेल्या बिबट्यांना जवळच्या जंगलात सोडले जात असल्याने ते पुन्हा गावात परत येतात, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात जागा संपल्यामुळे पुनर्वसनातही अडथळे निर्माण झाले आहेत.
बिबट्याच्या भीतीमुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला असून, पिंपरखेड व परिसरातील नऊ शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्या आहेत. त्यात जि. प. पिंपरखेड, कोयमहालेवस्ती, ढोमेमळा, दाभाडेमळा, गाजरेझाप, चांडोह (दुपारनंतर), माध्यमिक विद्यालय पिंपरखेड, जांबुत आणि वडनेर खुर्द या शाळांचा समावेश आहे. “शिक्षक उपस्थित असूनही विद्यार्थी येत नसल्याने शाळा बंद राहिल्या,” असे शिक्षण विस्तार अधिकारी के. बी. खोडदे यांनी सांगितले.