पुणे : सीबीआय, ईडी अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत, मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला असून, अटकेची भीती दाखवून सायबर ठगांनी खराडी येथील एका ज्येष्ठाकडून २६ लाख ५० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका ६५ वर्षीय व्यक्तीने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरांविरोधात आयटी ॲक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. २२ जून ते ९ जुलै या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
सायबर ठगांनी व्हॉट्सॲपद्वारे फिर्यादींशी संपर्क साधला. त्यांना व्हिडीओ कॉल करून आपण सीबीआय आणि ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी केली. तुमच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. तुमच्या आधारकार्डचा आणि काही कागदपत्रांचा त्यामध्ये वापर झाला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भीती त्यांनी फिर्यादींना दाखवली. त्यानंतर केस क्लिअर करणे तसेच केसची चौकशी करण्याच्या बहाण्याने फिर्यादींना त्यांच्याकडील पैसे सायबर ठगांनी आपल्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले. फिर्यादींनी भीतीपोटी २६ लाख ५० हजार रुपये सायबर ठगांनी दिलेल्या बँक खात्यावर जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच फिर्यादींनी पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास खराडी पोलिस करत आहेत.