वाढदिवसाच्या एका दिवसानंतर नियतीने जीव हिरावून घेतला; रस्ता नसल्याने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 21:13 IST2026-03-17T21:13:08+5:302026-03-17T21:13:16+5:30

जुन्नर जुन्नर व आंबेगाव तालुक्याच्या हद्दीवरती असणार्‍या अतिशय दुर्गम भागातून रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिमुकल्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत

Fate took his life a day after his birthday; 2-year-old child dies due to lack of road | वाढदिवसाच्या एका दिवसानंतर नियतीने जीव हिरावून घेतला; रस्ता नसल्याने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

वाढदिवसाच्या एका दिवसानंतर नियतीने जीव हिरावून घेतला; रस्ता नसल्याने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

भीमाशंकर : जुन्नरआंबेगाव तालुक्याच्या हद्दीवरती असणार्‍या अतिशय दुर्गम भागातील खेतेपठार भागात दोन वर्षांच्या चिमुकल्या आदित्य विकास घनकुटे याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. वाढदिवसाच्या आनंदानंतर अवघ्या एका (ता १६ ) दिवसातच नियतीने हा निरागस जीव हिरावून घेतला.

रविवारी (ता.१५) रात्री आदित्यचा वाढदिवस कुटुंबीयांनी उत्साहात साजरा केला होता. सोमवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे खेळत होता. मात्र सकाळी १० वाजता जेवताना अचानक ठसका लागून तो बेशुद्ध पडला. काही वेळाने शुद्धीवर आला, पण प्रकृती चिंताजनक असल्याने कुटुंबीयांनी तातडीने दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला.

परंतु खेतेपठारच्या दुर्दैवी वास्तवाने त्यांच्या प्रयत्नांना अडथळा आणला. गावात जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने आई सुनीता आणि आजी शारदा यांनी आदित्यला पाठीवर घेऊन सुमारे चार किलोमीटरचा डोंगर उतार पायी पार केला. आमोंडी येथे पोहोचल्यानंतर काका दत्तात्रय खमसे यांनी दुचाकीवरून त्याला घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरू असतानाच आदित्यचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खेतेपठारसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. “वेळेत रस्ता आणि उपचार मिळाले असते, तर माझा मुलगा वाचला असता,” अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया वडील विकास घनकुटे यांनी दिली.आमोंडीचे उपसरपंच धनंजय फलके म्हणाले, खेतेपठार ते आमोंडी हा चार किलोमीटरचा रस्ता आहे. हा संपूर्ण रस्ता वन खात्याच्या हद्दीतून असल्यामुळे रस्ता होण्यासाठी अडचणी आहेत. या रस्त्यासाठीचा प्रस्ताव यापूर्वीच वन विभागाला दिला आहे. राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून हा रस्ता होण्यासाठी जोरदार पाठपुरावा करू. हा रस्ता झाल्यास येथील लोकांचा प्रश्न सुटेल. जुन्नर-आंबेगाव सीमेवरील खेतेपठार हा भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. वैष्णवधाम (ठाकरवाडी) येथील कच्चा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला असून वाहतुकीस पूर्णपणे अयोग्य झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण ठरत आहे. आदित्यच्या मृत्यूने एक गंभीर प्रश्न समोर आला आहे .या घटनेतून प्रशासनाने धडा घेत तातडीने रस्त्याचा प्रश्न सोडवावा, हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

Web Title: Fate took his life a day after his birthday; 2-year-old child dies due to lack of road