कात्रज - कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; एक ठार पाच जखमी, शाळकरी मुलेही जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 10:41 IST2023-08-10T10:40:50+5:302023-08-10T10:41:09+5:30
वाहतुकीचा ताण बघता अपुरा रस्ता, वाहतुकीचे अपुरे नियोजन, ठेकेदारांचा बेजबाबदारपणा यामुळे वारंवार अपघात घडतायेत

कात्रज - कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; एक ठार पाच जखमी, शाळकरी मुलेही जखमी
पुणे : कात्रजकोंढवा रस्त्यावर आज सकाळी नऊ वाजता भीषण अपघात झाला आहे. कात्रजकोंढवा रस्त्यावरील कोंढवा येथील स्मशानभूमी जवळ माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या कार्यालयासमोरच हा अपघात झाला. सदर अपघातामध्ये एकूण दहा गाड्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये एक व्यक्ती ठार झाला आहे. तर पाच व्यक्ती गंभीर जखमी आहेत. तसेच काही शाळकरी मुलेही जखमी झाल्याचे समजते आहे.
सदर अपघात हा कात्रज कोंढवा रोड वरील स्मशानभूमी जवळ रस्ता अरुंद असल्याने झाला. या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण बघता अपुरा रस्ता, वाहतुकीचे अपुरे नियोजन, ठेकेदारांचा बेजबाबदारपणा यामुळे वारंवार अपघात घडत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच आयुक्तांचा कात्रज कोंढवा रोड रस्ता रुंदीकरण जागा हस्तांतरण या संदर्भात महत्त्वाचा पाहणी दौरा झाला. त्यानंतर लगेच दोनच दिवसानंतर अपघात झाला. अपघाताचे सत्र सुरूच आहे. प्रशासनाचे वारंवार दौरे देखील सुरू आहेत. पण यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे बळी जातात त्याचे काय? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सदर ठिकाणी परिसरातील सर्वसामान्य नागरिक तसेच काही समाजसेवक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघात असताना मदत केली. यामध्ये हेमंत बधे, अमर कामठे, निखिल मुनोत, समीर शिंदे अशा अनेक लोकांनी अपघात ग्रस्ताना मदत करून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले.