Pune: पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोन युवकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 13:53 IST2023-10-21T13:53:27+5:302023-10-21T13:53:49+5:30

अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु...

Fatal accident involving truck and two-wheeler on Pune-Solapur highway, two youths killed | Pune: पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोन युवकांचा मृत्यू

Pune: पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोन युवकांचा मृत्यू

लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गावर हिंदुस्थान पेट्रोलियम डेपोजवळ ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा अपघातस्थळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.२१) रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकची दोन्ही चाके दोन्ही युवकांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. परंतु दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. गणेश विठ्ठल हवालदार (वय २६), आदित्य हरिदास साठे (वय २६, रा. दोघेही, महादेवनगर, हडपसर, ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश व आदित्य हे थेऊर (ता. हवेली) येथून घरी महादेवनगर येथे पुणे-सोलापूर महामार्गावरून निघाले होते. कदमवाकवस्ती हद्दीतील हिंदुस्थान पेट्रोलियम डेपोसमोर आले असता दुचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्यांची दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली. दुचाकी दुभाजकाला धडकल्याने दोघेही सोलापूरच्या बाजूला जाणाऱ्या दिशेला उडून पडले. यावेळी सोलापूरच्या दिशेने निघालेल्या अज्ञात भरधाव ट्रक दोघांच्या अंगावरून गेली. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा झाला असून गुन्हा अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

Web Title: Fatal accident involving truck and two-wheeler on Pune-Solapur highway, two youths killed