११ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह पाहून कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला; आईच्या कुशीतून बिबट्याने नेले होते ऊसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 14:02 IST2025-05-01T14:01:26+5:302025-05-01T14:02:23+5:30
मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर आईसोबतच भिसे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला, दुर्दैवी घटनेने उपस्थित ग्रामस्थांचे डोळे देखील पानावले होते

११ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह पाहून कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला; आईच्या कुशीतून बिबट्याने नेले होते ऊसात
राहू: दौंड तालुक्यातील दहिटणे गावा नजीक असलेल्या बापूजीबुवा वस्ती येथे बुधवार (दि.३०) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मेंढपाळांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला चढवून अनवित धुळा भिसे या अकरा महिन्याच्या मुलाला ऊसात घेऊन गेल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती. वनविभागाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्यानंतर तब्बल ३१ तासांच्या अथक प्रयत्नानंतर लहान मुलाचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात लहान मुलाला ऊसाच्या शेतात ओढून नेले होते. लहान मुलाचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी वनविभागाच्या वतीने रेस्क्यू टीम, श्वान पथक आणि ड्रोनच्या सहाय्याने परीसरातील पंधरा ते वीस एकर क्षेत्राहून अधिक आजूबाजूच्या ऊसाच्या शेतात शोधमोहीम राबविण्यात आली होती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत टीमच्या वतीने प्रयत्न करून देखील मुलाचा शोध लागला नव्हता. गुरुवारी (दि.१) रोजी सकाळी सहा वाजल्यापासूनच शोध मोहीमेला सुरुवात करण्यात आली होती. श्वान पथकाला पुन्हा एकदा पाचारण करून मागावर शोध घेता घेता उसाच्या शेतामध्ये रेस्क्यू टीमला बारा वाजण्याच्या सुमारास लहान बाळाचा मृतदेह आढळून आला. मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर भिसे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. दुर्दैवी घटनेने उपस्थित ग्रामस्थांचे डोळे देखील पानावले होते. वनविभागाकडून घटनेचा रीतसर पंचनामा करण्यात आला आहे.