ईटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल;पुण्यातील कंपनीला सव्वा दोन कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 14:57 IST2025-07-12T14:57:02+5:302025-07-12T14:57:31+5:30

या कंपनीची इटलीतील एका ऑटोमोबाइल कंपनीशी करारानुसार देवाणघेवाण सुरू होती. मात्र, सायबर चोरट्याने इटलीतील कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेला बनावट ई-मेल पाठवून ही फसवणूक केली.

Fake email in the name of a company in Italy; Pune company defrauded of Rs. 2.5 crore | ईटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल;पुण्यातील कंपनीला सव्वा दोन कोटींचा गंडा

ईटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल;पुण्यातील कंपनीला सव्वा दोन कोटींचा गंडा

पुणे : शहरातील नऱ्हे भागात असलेल्या नामांकित कंपनीची तब्बल २ कोटी ३५ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कंपनीची इटलीतील एका ऑटोमोबाइल कंपनीशी करारानुसार देवाणघेवाण सुरू होती. मात्र, सायबर चोरट्याने इटलीतील कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेला बनावट ई-मेल पाठवून ही फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२७ फेब्रुवारी ते १० जून २०२५ या कालावधीत ही फसवणूक घडली. याबाबत कंपनीच्या ५२ वर्षीय संचालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीचा इटलीतील एका कंपनीशी ऑटोमोबाइल पार्ट्स उत्पादनासाठी मशीन खरेदीचा करार झाला होता. त्यानुसार ठरलेल्या अटींनुसार काही टप्प्यांमध्ये पेमेंट केले जाणार होते. त्यानुसार दोन वेळा पेमेंट प्रक्रिया व्यवस्थित पार पडली. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील रकमेच्या पेमेंटवेळी सायबर गुन्हेगारांनी इटलीतील कंपनीच्या अधिकृत ई-मेलसारखा नावात साधर्म्य असलेला बनावट ई-मेल तयार करून पुण्यातील कंपनीशी संपर्क साधला. त्यात यापूर्वी पेमेंट केलेल्या खात्याव्यतिरिक्त दुसरे बँक खाते आणि अधिकाऱ्यांची सही असलेले इनव्हॉइस पाठविण्यात आले.

यावर विश्वास ठेवून कंपनीने नवीन साईटवर तब्बल २ कोटी ३५ लाख रुपये ट्रान्स्फर केले. युरो चलनामध्ये ही रक्कम पाठविण्यात आली. मात्र, मूळ कंपनीकडून पैसे मिळाले नसल्याचे समजताच फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. प्राथमिक तपासात हे संपूर्ण प्रकरण सायबर फसवणुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. यावरून सायबर पोलिसांनी फसवणुकीसाठी वापरलेला ई-मेल आयडी, बँक खातेदार व रक्कम प्राप्त करणाऱ्या इतर बँक खात्यांच्या लाभार्थींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Fake email in the name of a company in Italy; Pune company defrauded of Rs. 2.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.