Nira river : नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट; शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:34 IST2025-02-12T13:33:52+5:302025-02-12T13:34:08+5:30

फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची अवस्था बिकट असल्याचे वास्तव आहे.

Extreme decrease in water level of Nira river Farmers concerns increase | Nira river : नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट; शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर

Nira river : नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट; शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जीवनदायिनी असलेल्या नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट होत आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबत नदीपात्रातील पाण्याची पातळी घटत चालली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. सध्या निमसाखरच्या पश्चिम भागात नदीपात्रात पाणी साठा दिसून येत असला तर निमसाखरपासून पुढे निरवांगी बाजूला नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची अवस्था बिकट असल्याचे वास्तव आहे.

पाऊस सुरू होण्याचा साधारण १५ जूनपर्यंतचा कालावधी गृहीत धरल्यास शेतकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या बाबतीत दाहकता निर्माण होणार असल्याची चिंता शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जात आहे. नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची ढापे टाकून पाणी गळती थांबवण्यात आली असल्याने फेब्रुवारी महिन्याचा शेवट ते मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंतच हे पाणी टिकू शकते.

तालुक्याच्या पश्चिम भागात ऊस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, उसासोबतच डाळिंब, केळी, पेरू, द्राक्ष यासारख्या फळबागांचे क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणात आहे तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, कडवळ पिकांची लागवड केली जाते. या पिकांचे भवितव्य बहुतांश प्रमाणात नीरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाणीसाठा घटत असल्याने या पिकांचे भवितव्य सध्यातरी अधांतरीच आहे.

नीरा नदीपात्रात सध्या पाणी पातळी कमी होत आहे. वाढत्या उन्हामुळे हे पाणी पंधरा ते वीस दिवसांपेक्षा अधिक दिवस पाणीसाठा उपयुक्त ठरेल. मात्र, आता आमच्याकडे ऊस पीक असून, नदीपात्रातील पाणी संपल्यानंतर पावसाळ्यापर्यंत पिकासाठी व जनावरांच्या पिण्यासाठीच्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे. -हरिश्चंद्र रणवरे, शेतकरी, निमसाखर  

नीरा नदीमध्ये निमसाखरपासून खाली निरवांगी, खोरोची भागात पाणी राहिले नसून सध्या पिकांसाठी पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत या भागातील पिकांच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचे संकेत आहेत. -समीर जाधव, युवा शेतकरी, निरवांगी 

Web Title: Extreme decrease in water level of Nira river Farmers concerns increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.