उत्पादन शुल्क विभागाकडून बॉलरसह मुंढवा, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क भागातील १४ पबवर कारवाई
By नितीश गोवंडे | Updated: May 26, 2024 17:28 IST2024-05-26T17:27:49+5:302024-05-26T17:28:05+5:30
शनिवारी रात्री तरुणाईची या भागात गर्दी असते. एकाच वेळी १४ पब, बारविरोधात कारवाई करून त्यांना सील करण्यात आल्याने या भागात शुकशुकाट

उत्पादन शुल्क विभागाकडून बॉलरसह मुंढवा, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क भागातील १४ पबवर कारवाई
पुणे : कल्याणी नगर भागातील बाॅलर पबसह १४ पब, बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून उत्पादन शुल्क विभागाने मुंढवा, कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई सुरू केल्याने या भागात शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे.
कल्याणी नगर भागात गेल्या रविवारी (१९ मे) भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याचा मुलगा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पबमध्ये मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टीनंतर घरी परतत असताना अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वार अनिश आणि सहप्रवासी अश्विनी यांना कल्याणी नगर भागात धडक दिली. अनिश आणि अश्विनी बाॅलर पबमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना मोटारीने धडक दिली होती. या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आठवडाभरात शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या पब आणि बारवर कारवाई करून सील केले.
शनिवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाने कल्याणीनगर, मुंढवा भागातील १४ पब, बारवर कारवाई केली. बाॅलर पबवर देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक वसंत कौसडीकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. मद्य विक्री नियमावलीचे, एक्साईज रजिस्टरमध्ये नोंदी योग्य नसल्याने या पबवर कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली. कल्याणीनगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, बाणेर-बालेवाडी भागातील पब, बारविरोधात कारवाई करण्यात आली. शनिवारी रात्री तरुणाईची या भागात गर्दी असते. एकाच वेळी १४ पब, बारविरोधात कारवाई करून त्यांना सील करण्यात आल्याने या भागात शुकशुकाट असल्याचे दिसून आले.
मद्य विक्री नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील पब, बार, रेस्टॉरंट आणि रूफ हाॅटेल्सविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आठवडभरात ५४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. परवाना निलंबित केल्यानंतर संबंधित बार, पब सील करण्यात आले आहेत.- चरणसिंह रजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग