'सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात', भरणेंचा अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:04 IST2025-08-01T17:04:02+5:302025-08-01T17:04:42+5:30
दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान करून उपस्थितांचे कान टवकारले

'सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात', भरणेंचा अजब सल्ला
पुणे: राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान करून उपस्थितांचे कान टवकारले. महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले की, “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात'' त्याची माणसं नोंद ठेवतात. या विधानाने कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
महसूल दिनासारख्या गंभीर प्रसंगी कृषिमंत्र्यांकडून अशी मांडणी होणे, हे अनेकांना पचनी पडले नसावे. महसूल विभागाकडून पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा अपेक्षित असताना, मंत्र्यांनी “काम वाकडं करून परत सरळ करण्याचा” सल्ला दिल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भरणे यांनी पुढे शेतकऱ्यांच्या तक्रारींना वेळीच न्याय मिळावा आणि योजनांचा लाभ योग्य हक्कदारांपर्यंत पोहोचावा, असेही सांगितले. मात्र त्यांच्या अजब विधानामुळे मंत्री महोदय अडचणी येण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगणार असून , कृषिमंत्री पदाची जबाबदारी नुकतीच स्वीकारलेल्या भरणे यांनी अशा स्वरूपाचे मार्गदर्शन करणे कितपत योग्य? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील सर्वांनी माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खात मिळते यासारखा आनंद कुठला असू शकतो. कृषी खात्याच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, शेतकऱ्यांच्या शेतीत नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवतातील यावर माझा भविष्यात प्रयत्न असणार आहे.