Online Exam: सगळ्यांनाच ९० टक्क्यांच्यावर गुण, नोकरी द्यायची कोणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 14:57 IST2022-01-23T14:56:56+5:302022-01-23T14:57:13+5:30
विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात असल्यामुळे 40 टक्क्यांच्या आसपास असणारा इंजिनिअरिंगचा निकाल 100 टक्के लागत आहे

Online Exam: सगळ्यांनाच ९० टक्क्यांच्यावर गुण, नोकरी द्यायची कोणाला?
राहुल शिंदे
पुणे : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात असल्यामुळे 40 टक्क्यांच्या आसपास असणारा इंजिनिअरिंगचा निकाल 100 टक्के लागत आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी परीक्षा घेतली जात आहे. तसेच ‘वर्क कल्चर’ बदलल्याने आयटी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. त्यामुळे कंपनी व विद्यार्थी दोघांचा फायदा होत आहे.
पुणे शहर व परिसरात अनेक आयटी कंपन्या असून या कंपन्यांमध्ये रोजगारासाठी जाणा-या तरुणांची संख्या चांगलीच वाढली आहे. कारण कोरोनामुळे 2019-21 या कालावधीत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची परीक्षा देणारा प्रत्येक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. सर्वांनाच 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. परिणामी कोणत्या विद्यार्थ्याला नोकरी द्यावी,असा प्रश्न कंपन्यांसमोर उभा राहिला. त्यामुळे विद्यार्थ्यांवर एक प्रकारे कोरोनाचा शिक्का पडला असून विविध कंपन्यांकडून आता विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे.
नामांकित ‘आयटी’ कंपन्यांना कर्मचा-यांसाठी प्रशस्त कार्यालय, कँटिन, वाहतुक व्यवस्था, कॉम्प्युटर - इंटरनेट आदी तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्यावी लागते. परंतु, कोरोनामुळे आयटी कंपन्यांकडून अधिक ‘वर्क फॉर्म होम’ ला पसंती दिली जात आहे. कारण या पायाभूत सुविधांसाठी होणारा कंपनीचा खर्च कमी झाला आहे. तसेच पुण्यात येऊन भाडेतत्वावर घर घेणे, मेस लावणे आदीसाठी कर्मचा-यांना करावा लागणारा खर्च बंद झाला आहे. परिणामी बाहेर गावाहून पुण्यात कामासाठी येणा-या कर्मचा-यांनाही घरी बसून काम करणे सोपे जात आहे.
‘वर्क फ्रॉम होम’ मुळे कमी पगार दिला तरी विद्यार्थी हे काम स्वीकारतात
''सर्वच विद्यार्थी 90 टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण होत आहेत. त्यामुळे कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट करण्यासाठी परीक्षा घेतली जात आहे. परिणामी कोरोनाचा फटका सर्वसाधारण विद्यार्थ्यांबरोबर हुशार विद्यार्थ्यांना सुध्दा बसत आहे. तसेच कोरोनामुळे ‘वर्क कल्चर’ बदलल्याने ‘फ्रेशर’विद्यार्थ्यांना घरी बसून सुमारे 150 तासांचे ऑनलाईन काम दिले जात आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे कमी पगार दिला तरी विद्यार्थी हे काम स्वीकारत आहे असे डॉ.पराग काळकर (अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी सांगितले.''
''कोरोना काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगारास मोठ्या अडचणी येत आहेत. माझ्या मुलाने मागील वर्षी कंप्युटर सायन्सची पदवी घेतली. परंतु, त्याला व त्याच्या वर्गातून उत्तीर्ण झालेल्या एकाही विद्यार्थ्याला नोकरी मिळत नाही.परंतु,कोरोनापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहज नोकरी मिळत असल्याचे दिसून येत आहे असे पालक रोहिणी विटणकर म्हणाल्या आहेत.''