वर्ष होऊनही एकतानगरीचे पुनर्वसन कागदावरच; महापालिकेने पाठविलेला प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 11:38 IST2025-08-21T11:38:19+5:302025-08-21T11:38:48+5:30
राज्य सरकारकडून कोणतेही आदेश न आल्यामुळे वर्ष होऊनही एकतानगरीचे पुनर्वसन कागदावरच आहे

वर्ष होऊनही एकतानगरीचे पुनर्वसन कागदावरच; महापालिकेने पाठविलेला प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडून
पुणे: खडकवासला धरणातून नदीपात्रात ३९ हजार क्युसेक्स पाणी सोडले आहे. त्यामुळे एकतानगरमधील सोसायट्यामध्ये पुन्हा पाणी शिरले आहे. त्यामुळे एकतानगरीच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी सिंहगड रस्त्यावरील एकतानगरमध्ये निळ्या रेषेच्या आतील बांधकामांचे पुनर्वसन करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार विठ्ठलवाडी (हिंगणे खुर्द) येथील नियोजित सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूस महापालिकेच्या जागेवर पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. पण राज्य सरकारकडून कोणतेही आदेश न आल्यामुळे वर्ष होऊनही एकतानगरीचे पुनर्वसन कागदावरच आहे.
पुणे शहर व खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे २५ जुलै २०२४ रोजी मुठा नदीला पूर आला. त्यामध्ये एकतानगर भागातील अनेक सोसायट्या, दुकानांमध्ये पाणी घुसले. त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून, या खर्चातून अद्याप नागरिक पूर्णपणे सावरलेले नाहीत. या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या. या भेटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी पुराचा धोका टाळण्यासाठी नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी विशेष दर्जा देऊन क्लस्टर केले जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर महापालिकेने या भागात केलेल्या सर्वेक्षणात निळ्या पूररेषेसह निळ्या लाल पूररेषेच्या आतमध्ये १०३ इमारती आढळून आल्या. त्यामध्ये १ हजार ३८३ सदनिका तर ६७ दुकानांचा समावेश आहे. या इमारतीचे निवासी क्षेत्रफळ हे ८७ हजार ३९९ चौरस मीटर असून, व्यापारी क्षेत्र १ हजार ३४० चौरसमीटर इतके आहे. बांधकाम नियमावलीनुसार दाट लोकवस्ती नसलेल्या भागात दोन हेक्टरपेक्षा जास्त भूखंडावर क्लस्टर करता येऊ शकते. ठाण्यात या पद्धतीने राज्य सरकारने क्लस्टर योजना राबविली, त्याच पद्धतीने एकतानगरीमध्ये आराखडा तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६९८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकतानगरीमध्ये निळ्या रेषेच्या आतील बांधकामांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी राज्य सरकारकडे पाठविला होता. पण त्यावर पुणे महापालिका प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केला होता. पण त्याबाबत राज्य सरकारकडून कोणतेही आदेश आले नाहीत.
जागाही ठरली, पण पुढे काहीच झाले नाही
एकतानगरीमधील पूररेषेच्या आतील बांधकामांचे पुनर्वसन करण्यासाठी मंत्रालयात पाठवला आहे. नियोजित सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या मागे महापालिकेची जागा आहे, तेथे हे पुनर्वसनासाठी जागा निश्चित केली आहे. पण राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जागा निश्चित होऊनही पुढे काहीच झाले नाही.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी केराची टोपली
विठ्ठलवाडी (हिंगणे खुर्द) येथील नियोजित सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूस महापालिकेच्या जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठीचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्याचबरोबर एकतानगर विठ्ठलनगर, निंबजनगर या भागातील इमारती व वस्ती यांचे पुरापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागात नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ३०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी पुणे महापालिका आयुक्तांनी राज्य सरकाराच्या नगरविकास विभागाकडे २६ जून रोजी प्रस्ताव पाठवून केली आहे. त्यात १५ व्या वित्त आयोगानुसार एकतानगरी येथे आपत्ती निवारण निधी वापरता येऊ शकतो. पुणे महापालिका नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवत आहे. त्याअंतर्गत ११ टप्प्यांपैकी मुठा नदीवरील भागांचा समावेश असलेला वडगांव खुर्द ते राजाराम पूल या भागाचा स्ट्रेच-६ सुमारे ४.१० कि.मी. लांबीचा समावेश आहे. नदी सुधार प्रकल्पाच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट पुराच्या पाण्यापासून लगतच्या वस्ती व भागाचे संरक्षण करणे हा देखील आहे, असे प्रस्तावात नमूद केले आहे; पण पावणेदोन महिन्यांपेक्षा जास्त कालवधी होऊन त्यासाठीचा निधी आणि त्याबाबतचे साधे पत्रही पालिकेला अद्याप आलेले नाही.