एन्काऊंटर हा शेवटचा उपाय असतो: सहायक पोलीस आयुक्त राम जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:05+5:30

२२ वर्षाच्या सेवेत १६ एन्काऊंटर केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे मनोगत....

The encounter is the last option : Assistant Police Commissioner Ram Jadhav | एन्काऊंटर हा शेवटचा उपाय असतो: सहायक पोलीस आयुक्त राम जाधव

एन्काऊंटर हा शेवटचा उपाय असतो: सहायक पोलीस आयुक्त राम जाधव

Next

- विवेक भुसे - 
पुणे : गुन्हेगारांना पकडण्यासाठी जाताना पोलीस त्याला शरण येण्यासाठी आवाहन करतात़. पण, तरीही अनेकदा गुन्हेगार त्याला दाद देत नाही़. उलट पोलिसांवर फायरिंग करतात़. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या स्वत:च्या आणि सहकाऱ्यांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी उलट फायरिंग करावे लागते़. त्यात गुन्हेगार जखमी होऊन त्याचा मृत्यु होतो़. अनेकदा गुन्हेगाराने केलेल्या फायरिंगमध्ये पोलीस जखमी झाले आहेत़. एन्काऊंटर हा शेवटचा उपाय असतो, असे मत सहायक पोलीस आयुक्त राम जाधव यांनी सांगितले़. 
     ''राम जाधव यांनी त्यांच्या आजवरच्या पोलीस सेवेत १९९७ पासून किमान २२ वर्षाच्या सेवेत १६ एन्काऊंटर केले आहेत़. त्यातील १४ एन्काऊंटर हे पुणे जिल्ह्यातील आहेत़. हैदराबाद येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ' लोकमत '  ने त्यांच्याशी संवाद साधला़. ''
जाधव म्हणाले , पोलिसांना कोणाला निष्कारण मारायचे नसते़. कारण त्यांना त्यांच्याकडील प्रत्येक गोळीचा जबाब द्यावा लागत असतो़. अनेकदा पोलीस गुन्हेगारांना पकडण्यासाठी जातात़. तेव्हा त्यांनी काही ठरविलेले नसते़ असे काही ठरवून केले जात नाही़. जसा प्रसंग येईल, त्या त्या वेळी काही क्षणात निर्णय घ्यावा लागत असतो़. पुण्यात माळवदकर, आंदेकर या दोन टोळ्यांमधील टोळीयुद्धात अनेक जणांचे खुन झाले होते़ तेव्हा पुण्यात या दोन टोळ्यांची दहशत होती़. आम्ही प्रमोद माळवदकर याच्या शोधात होतो़. १९९७ मध्ये प्रमोद माळवदकर हा काळेवाडी येथे आल्याची माहिती मिळाली होती़. त्यानुसार पहाटेच्या सुमारास आम्ही काळेवाडी येथील रस्त्यावर सापळा रचून थांबलो होतो़. त्यावेळी औंधकडून काळेवाडीला जाणारा रस्ता खूपच छोटा होता़. तो स्कुटरवर आल्याचे पाहिल्यावर आम्ही गाडी आडवी घालून त्याला थांबण्याचा इशारा केला़. तेव्हा तो स्कुटर टाकून पळून जवळच्या एका पडिक घरात शिरला़. आम्ही त्याला बाहेर येऊन शरण येण्यास सांगितले़. मात्र, त्याने स्वत:जवळील पिस्तुलातून आमच्या दिशेने फायरिंग केले़. त्यावेळी एक गोळी माझ्या डाव्या हाताला चाटून गेली़. त्यामुळे आम्ही उलट केलेल्या फायरिंगमध्ये तो जखमी झाला़. ससून रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यु झाला होता़. त्यावेळी आपण पोलीस उपनिरीक्षक होतो़. आपला तो पहिला एन्काऊंटर होता़. 
विश्वनाथ कामत याने १९९९ मध्ये पुणे शहरात अनेक व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागण्याचे गुन्हे केले होते़. कामत व त्याचे सहकारी अशोक पांडे, हनुमंत कोळेकर हे हडपसरहून खराडीकडे जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती़. तेव्हा खराडीजवळ पहाटेच्या सुमारास आम्ही त्यांना अडविले़ तेव्हा त्यांनी आमच्यावर गोळीबार केला होता़. त्यात एक पोलीस हवालदार जखमी झाला़. त्यामुळे पोलिसांना स्वत:च्या रक्षणासाठी त्यांच्यावर गोळीबार करण्याशिवाय पर्याय नव्हता़. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता़. 

राम जाधव यांनी सांगितले की, मोबीन शेख या गुन्हेगाराने पुणे शहर व जिल्ह्यात हैदोस घातला होता़. तो नवी मुंबईत असल्याची माहिती मिळाली होती़. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉ़. सत्यपालसिंह यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना याची माहिती देऊन पुणे पोलिसांना सहकार्य करण्यास सांगितले होते़. नवी मुंबईत आम्ही ४ दिवस त्याचा शोध घेत होतो़. त्यावेळी तो मुंब्रा रोडला हायवेवरील एका हॉटेलजवळ आला असल्याची माहिती मिळाली़. आम्ही तेथे पोहचलो़. तेव्हा तो एका साथीदारासह चारचाकी गाडीतून जाऊ लागला होता़. आम्ही त्याला थांबण्याचा इशारा केल्यावर त्याच्या जोडीदाराने आमच्या दिशेने फायरिंग केले़. त्याच्याकडे पोलिसांकडे असतात, असे ९ एमएमचे पिस्तुल होते़. त्यातील एक गोळी आमच्या पथकाला एकाच्या बुलेटप्रुफ जॅकेटवर आदळली़ सुदैवाने जॅकेट असल्याने त्याला काही झाले नाही़. त्यानंतर आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करण्याशिवाय पर्याय नव्हता़. ही घटना हायवेवर भर दुपारी चार वाजता घडली होती़. पोलीस नेहमीच एन्काऊंटर ठरवून करत नसतात़. त्यांना अनेकदा पर्यायच शिल्लक रहात नाही़. 

पोलिसांबरोबरच्या चकमकीत गुन्हेगार मृत्यु पावल्यानंतर त्याची संपूर्ण चौकशी केली जाते, असे सांगून राम जाधव म्हणाले की, अशा एन्काऊंटरमध्ये ज्या परिमंडळातील अधिकारी, कर्मचारी सहभागी असतात़. त्या परिमंडळाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या परिमंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे याची चौकशी सोपविली जाते़. तसेच एन्काऊंटर झाल्यानंतर संबंधित गुन्हेगाराचे शवविच्छेदन हे तहसीलदार यांच्या देखरेखीखाली केले जाते़. त्याचे व्हिडिओ शुटींगही केले जाते़. तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांकडे त्याची न्यायालयीन चौकशी सोपविली जाते़. अशा एन्काऊंटरबाबत कोणाला काही म्हणणे मांडायचे आहे का, याची जाहीर केले जाते़. त्यानंतर त्याची जाहीर सुनावणी होऊन हा एन्काऊंटर खरोखरच गरजेचा होता का, याची तपासणी केली जाते़. 

       एखाद्या एन्काऊंटरविषयी कोणाचा आक्षेप असेल तर त्याची राज्य गुन्हे अन्वेक्षण विभागाकडे चौकशी सोपविली जाते़. ते संपूर्ण चौकशी करुन त्यावर निर्णय घेतात़. अनेकदा पोलिसांना जागेवर जो प्रसंग समोर येतो, त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो़. अशा चकमकीत पोलिसांच्याही जीवाला धोका असतो़ शिवाय त्यांना चौकशीला सामोरे जावे लागत असते व आपण ऐनवेळी घेतलेला निर्णय त्यावेळच्या परिस्थितीनुसार घेतला, हे चौकशी अधिकाऱ्याला पटवून द्यावे लागते़. 

Web Title: The encounter is the last option : Assistant Police Commissioner Ram Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.