इंदापूरला रोजगार हमी योजना उरली घरकुल; विहिरींच्या कामापुरतीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:05 IST2025-05-13T11:05:22+5:302025-05-13T11:05:51+5:30

- मजुरांअभावी कामे बंद पडण्याच्या मार्गावर; योजनेत मिळणारी हजेरीही तुटपुंजी, रस्त्यांच्या कामाबाबत संभ्रमता कायम, जीपीएस प्रणालीचा फटका वृक्ष संवर्धनाच्या कामांना

Employment guarantee scheme for Indapur remains a mere shelter; only for well work | इंदापूरला रोजगार हमी योजना उरली घरकुल; विहिरींच्या कामापुरतीच

इंदापूरला रोजगार हमी योजना उरली घरकुल; विहिरींच्या कामापुरतीच

इंदापूर : रोजगार हमी योजनेत मिळणारी हजेरी व शेतमजुरीतील हजेरीत असणारी तफावत, जीपीएस प्रणालीमुळे शासकीय दरात राबण्यापेक्षा शेतात मजुरी करणे बरे या विचारामुळे रोजगार हमीच्या कामापासून मजूर दुरावला जात आहे. त्यातच रस्त्यांची कामे यंत्राद्वारे करावीत, की मजुरांमार्फत करून घ्यावीत हा प्रश्न निर्माण झाल्याने रोजगार हमीची कामे फक्त घरकुल व विहिरींच्या कामांपुरतीच मर्यादित राहिली आहेत. रोजगार हमीची इतर कामे मजुरांअभावी बंद पडत चालली आहेत, असे इंदापूर तालुक्यातील चित्र आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागील काळात सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची अनेक कामे होत होती. मात्र, अनिष्ट प्रवृत्तींना आळा बसावा, राबणाऱ्या हाताला मोबदला मिळावा या उद्देशाने शासनाने जीपीएस प्रणालीचा उपयोग करण्यास सुरुवात केली. त्याचा पहिला फटका वृक्ष संवर्धनाच्या कामांना बसला. जीपीएस प्रणाली बसविण्याआधी आठवड्यातून एक दोन वेळा गेले, झाडांना पाणी दिले, भोवतालचे तण काढले तरी भागत असायचे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागील काळात सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची अनेक कामे होत होती. मात्र, अनिष्ट प्रवृत्तींना आळा बसावा, राबणाऱ्या हाताला मोबदला मिळावा या उद्देशाने शासनाने जीपीएस प्रणालीचा उपयोग करण्यास सुरुवात केली. त्याचा पहिला फटका वृक्ष संवर्धनाच्या कामांना बसला. जीपीएस प्रणाली बसविण्याआधी आठवड्यातून एक दोन वेळा गेले, झाडांना पाणी दिले, भोवतालचे तण काढले तरी भागत असायचे.

प्रणाली बसवल्यानंतर सकाळी हजेरी सुरू होत असताना व संध्याकाळी कामावरून सुटण्याआधी असे दोन फोटो काढणे बंधनकारक झाले. जो काम करतो त्याच मजुराचा फोटो व कामाचा तपशील द्यावा लागू लागला. परिणामी संबंधित मजुराला तेथे काम करणे ॥ अपरिहार्य होऊन गेले. कमी हजेरीत राबण्याऐवजी मजूर शेतात मजुरी करायला जाऊ लागले.विजयकुमार परीट गटविकास अधिकारी असताना गायगोठ्याची बरीच प्रकरणे मंजूर झाली होती. ती पूर्ण झाली नाहीत. सुरुवात झाली, एक दोन मस्टर निघाले.

काही लोकांचे प्रस्ताव मंजूर झाले. त्या काळात त्या विभागात कार्यरत असणाऱ्या एका लिपिकाने अर्थपूर्ण तडजोडी करून काही प्रस्तावांना मंजुरी दिली होती. ती कामे त्या विभागातील ऑनलाइन प्रणालीला अपूर्ण असल्याचे दिसत आहे. ती कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आताचे गटविकास अधिकारी व लिपिकाकडे आहे. ती पूर्ण झाल्याखेरीज गायगोठ्याच्या नवीन प्रस्तावांना मंजुरी देता येत नाही, हेही त्रांगडे होऊन बसलेले आहे.

या आधी रोजगार हमी योजनेंतर्गत पुरुष व महिला मजुराला २९७ रुपये हजेरी मिळत होती. ती आता ३१८ रुपये करण्यात आली आहे. शेतमजुरी करणाऱ्या पुरुषाला ७०० व महिलेस ५०० रुपये हजेरी मिळते. त्या हिशेबाने पुरुषाला ३८२, तर महिलेला १८२ रुपये कमी मिळतात. ही तफावत दूर करणे, रस्त्यांच्या कामांमधून काटेकोरपणे यंत्रे हद्दपार करुन मजुरांच्या हाताला काम देणे हे धोरण शासनाने राबवले तर रोजगार हमीवरच्या कामांवरील मजुरांची संख्या वाढेल.


बोगस हजेरीपत्रके भरून घेण्याचा सपाटा

रस्त्यांची कामे थोडक्या कालावधीत कमी श्रमात पूर्ण करून घेण्याचा घाट ग्रामपंचायतींनी घातला. संबंधित सरपंच, उपसरपंच व त्यांच्या मार्गदर्शकांनी शासकीय कर्मचाऱ्यांना हाताशी धरून रात्रीच्या वेळी यंत्राने कामे करून घेत, मजुरांची बोगस हजेरीपत्रके भरून घेण्याचा सपाटा लावला. त्या कामांच्या माध्यमातून मजुरांना मिळणारी रक्कम आपसात वाटून घेण्याचे प्रकारही वाढले.

यातून नफा मिळवणाऱ्या 'समाजसेवकांचा' वर्ग जागा झाला. रात्रीस चाललेली अशी कामे शोधायची. त्यांचे चित्रीकरण करायचे. ऑनलाइन तक्रार करण्याची धमकी देऊन 'त्या' पैशात वाटेकरी व्हायचे असा प्रकार होऊ लागला. काही ठिकाणी तक्रारीही झाल्या. त्यातून रस्त्याच्या कामांची हजेरी ही मजुरांच्या नावाने निघत असल्याने मजूर आणायचे कोठून हा प्रश्न पुढे आला.

 सध्या इंदापूर तालुक्यात घरकुल योजना व विहिरींची कामे रोजगार हमीमधून चालू आहेत. घरकुलांचे लाभार्थी आपल्याच घराच्या कामासाठी मजुरी करत आहेत. सध्या घरकुलाची ४३० कामे सुरू आहेत. त्यावर २१५० मजूर काम करत आहेत. विहिरींची ३० कामे सुरू आहेत. त्यावर ४५० मजूर काम करत आहेत.
- विनोद शिद, तांत्रिक अधिकारी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग, इंदापूर पंचायत समिती.

Web Title: Employment guarantee scheme for Indapur remains a mere shelter; only for well work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.