पुणे: मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र शिंदे नाराजी दाखवत असले तरीही आपल्या शिवसेना पक्षाची राजकीय वाटचाल दमदार कशी होत राहील याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असल्याचे दिसते आहे. ठाणे या त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा व त्यातही पुणे शहरावर लक्ष केंद्रीत केले असल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासह त्यांनी शहरात काही जणांना पक्षात प्रवेश दिला असल्याने या चर्चेला पुष्टी मिळत आहे.
पुणे जिल्ह्यात शिंदेसेनेचे दोन आमदार आहेत. त्यातील पुरंदरचे विजय शिवतारे हे शिवसेनेच्या फुटीच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याकडे आहेत. दुसरे जुन्नरमधून अपक्ष म्हणून निवडून आलेले शरद सोनवणे यांनीही निकालानंतर लगेचच शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला व आता तर त्यांच्या पक्षातच प्रवेश केला आहे. पुणे शहरातील कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसकडून विजयी झालेले, मात्र नंतरच्या सार्वत्रिक निवडणूकीत पराभव झालेले रविंद्र धंगेकर यांना शिंदे यांनी आता पक्षात प्रवेश दिला आहे. शिंदे यांचे हे धोरण पुणे जिल्हा व शहरात शिवसेनेची राजकीय शक्ती वाढवण्यासाठीच असल्याचे दिसते आहे.
त्याचबरोबर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या शहर व जिल्हा शाखेतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनाही ते पक्षात घेत आहेत. शिवसेना उबाठाचे जिल्हा उपप्रमुख असलेले राजेश पळसकर यांनी नुकताच शिंदेसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर शहरातील पदाधिकारी बाळासाहेब मालुसरे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेला जवळ केले आहे. मंत्री उदय सामंत यांच्याकडे शिंदे यांनी पुण्याची जबाबदारी दिली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनाही त्यांनी पुण्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
सामंत यांच्या आदेशाने शहराध्यक्ष नाना भानगिरे व जिल्ह्याचे पदाधिकारी रमेश कोंडे यांनी नुकताच पुणे जिल्हा व शहर असा एकत्रित शिवसंवाद मेळावा नुकताच घेतला. त्याला सामंत, डॉ. गो-हे यांच्याबरोबरच आमदार विजय शिवतारे, आमदार शरद सोनवणे हेही उपस्थित होते. धंगेकर यांना पुणे शहरात लक्ष घालण्याविषयी सांगण्यात आले असल्याचे यात सांगण्यात आले. त्यांनीही त्यानंतर लगेचच संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
राजकीय मोर्चेबांधणी करताना जिल्ह्यात राजकीय वर्चस्व असलेल्या व राज्यातील सत्तेत जवळ असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वादंग होणार नाही याचीही काळजी शिंदे यांच्याकडून घेण्यात येत आहे. आपल्या शिलेदारांनाही त्यांनी तसेच बजावले आहे. त्यामुळेच त्यांना धक्का लागणार नाही अशा पद्धतीने शांतपणे शिंदे यांचे काम शहर व जिल्ह्यात सुरू आहे.