‘ई-बस’मुळे पुणे शहरातील प्रदूषणात होतीये घट; पीएमपीला प्रोत्साहन निधी म्हणून ९८ कोटी रुपये मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 10:38 IST2025-11-13T10:37:53+5:302025-11-13T10:38:46+5:30
केंद्र सरकारच्या फेम एक व फेम दोन या योजनेनुसार पीएमपीमध्ये ६५० बस दाखल होणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४९० बस दाखल झाल्या आहेत

‘ई-बस’मुळे पुणे शहरातील प्रदूषणात होतीये घट; पीएमपीला प्रोत्साहन निधी म्हणून ९८ कोटी रुपये मंजूर
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात ई-बस दाखल झाल्यापासून आतापर्यंत सात कोटी ६० लाख इतका किलोमीटर प्रवास झाला आहे. त्यामुळे ५० हजार मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन घटल्याने प्रदूषण कमी झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार परिवहन विभागाने पीएमपीला प्रोत्साहन निधी म्हणून ९८ कोटी रुपये मंजूर केले होती. त्यापैकी तीन कोटी २० लाख रुपये पीएमपीला देण्यात आले आहेत, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. पीएमपीच्या ताफ्यात सध्या दोन हजारांहून अधिक बस आहेत. त्यातील १७०० ते १८०० बस विविध मार्गांवर धावतात. त्यामधून दिवसाला साधारण दहा लाख नागरिक प्रवास करतात. एकूण बसपैकी पीएमपीत ४९० या ई-बस, तर इतर बस या सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. २०१९ मध्ये पीएमपीने ई-बस घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५० बस दाखल झाल्या. त्यानंतर केंद्र सरकारच्या फेम एक व फेम दोन या योजनेनुसार पीएमपीमध्ये ६५० बस दाखल होणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४९० बस दाखल झाल्या आहेत. पीएमपीच्या हद्दीत एकूण सात ई-डेपो उभारण्यात आले आहेत. त्यापैकी भेकराईनगर, निगडी, बाणेर, वाघोली, पुणे स्टेशन, चऱ्होली, हिंजवडी टप्पा-२ असे सात आगार (डेपाे) आहेत. सध्या संचलनात असलेल्या ४९० ई-बसच्या माध्यमातून विविध मार्गांवर प्रवासी सेवा दिली जाते.
निधीचा पीएमपीला फायदा
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ नुसार प्रति ई-वाहन प्रोत्साहन निधी देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार पीएमपीच्या ताफ्यात ४९० बसला प्रोत्साहनपर निधी म्हणून ९८ कोटी रुपये मिळावे म्हणून पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी परिवहन विभागाच्या मुख्य सचिवांकडे मागणी केली होती. त्यानुसार परिवहन विभागाने प्रोत्साहन निधी म्हणून ९८ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे पीएमपीला दिलासा मिळाला आहे. उर्वरित रक्कम पुढील काळात लवकरच मिळणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यातील ४९० ई-बसचा आतापर्यंत सात कोटी ६० लाख किलोमीटर इतका प्रवास झाला आहे. यामुळे ५० हजार टन कार्बन उत्सर्जन वाचले आहे. त्या बदल्यात पीएमपीला प्रोत्साहन निधी म्हणून परिवहन विभागाने ९८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी काही रक्कमदेखील दिली आहे. याचा पीएमपीला फायदा होणार आहे. - पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी