सिंहगड रस्त्यावरील आरएमसी प्लांटच्या धुळीमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात; नियमभंगावर कठोर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:14 IST2025-01-15T16:14:10+5:302025-01-15T16:14:21+5:30
प्लांटमुळे होणाऱ्या प्रचंड धुळीच्या समस्येमुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनासंबंधित आजारांना सामोरे जावे लागत आहे

सिंहगड रस्त्यावरील आरएमसी प्लांटच्या धुळीमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात; नियमभंगावर कठोर कारवाईची मागणी
पुणे : सिंहगड रोड, वडगाव बुद्रूक, प्रयेजा सिटी रस्त्यावरील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट (आरएमसी) गेल्या चार वर्षांपासून कोणत्याही नियमांचे पालन न करता सुरू असून, या प्लांटमुळे होणाऱ्या प्रचंड धुळीच्या समस्येमुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनासंबंधित आजारांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय, धुळीमुळे निर्माण होणारे प्रदूषण आणि अवजड वाहतुकीमुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. या गंभीर समस्येवर ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठवला असून, स्थानिकांनी आता कारवाईची मागणी केली आहे.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी माजी नगरसेवक हरिदास चरवड आणि वाहतूक पोलिसांची मंगळवारी (दि. १४) बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पंधरा प्लांट्सचे मालक उपस्थित होते. प्रयेजा सिटी सोसायटीचे अध्यक्ष लोकेश भावेकर तसेच पदाधिकारी आनंद खळदकर, विजय निगडे, अनिरुद्ध देशमुख, अजित भोसले, अमोल कोरडे तसेच परिसरातील इतर सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आरएमसी प्लांटने त्वरित सर्व नियम पाळण्याचे आश्वासन दिले आहे. त्यात महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमांचे पालन करण्यात येईल, प्रयेजा सिटी रोड संपूर्णपणे स्वच्छ होईल, डस्ट सेक्शन मशीन रोज फिरवण्यात येईल, बॅरिकेड्स उपलब्ध करून देण्यात येईल आणि प्लांटमधून सिमेंटचे धूलिकण उडून प्रदूषण होणार नाही अशा उपाययोजना, पाण्याची नियमित फवारणी करण्याचे आश्वासन आरएमसी प्लांटच्या प्रतिनिधींनी दिली. या प्रकरणात पुढची बैठक दि. १४ फेब्रुवारीला होणार असून, नियमांचे पालन न केल्यास महापालिका आणि प्रदूषण नियामक मंडळाने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. तसेच परिसरात अवजड वाहने रहदारीच्या वेळेत येऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिस लक्ष देणार आहेत. मुळात हे सिमेंट प्लांट नागरी वस्तीत उभारण्याची परवानगी महापालिका आणि प्रदूषण नियामक मंडळाने कशी दिली यावर स्थानिक नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत.