दसऱ्याला घर, वाहन खरेदीला पसंती; सोन्याचे दर चढे; तरीही सोने खरेदीचा उत्साह कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 12:52 IST2025-10-02T12:52:36+5:302025-10-02T12:52:54+5:30
साडेतीन मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास सोने वृद्धिंगत होते असे म्हणतात. सध्या सोनं आणि चांदीच्या किमती लाखाच्या घरात असूनही, नागरिकांचा सोने खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही.

दसऱ्याला घर, वाहन खरेदीला पसंती; सोन्याचे दर चढे; तरीही सोने खरेदीचा उत्साह कायम
पुणे : 'दसरा' हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. दसऱ्याचा मुहूर्त कोणत्याही प्रकारच्या नवीन खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. उद्या ( दि. २) दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी नवीन घरासह ऑफिस आणि वाहन खरेदीला नागरिकांनी पसंती दर्शविली आहे. हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांवर सोने व चांदीच्या खरेदीला खूप महत्त्व आहे. यंदा सोन्याचे दर गगनाला भिडले असूनही, सराफी बाजारपेठेत सोने खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण आहे.
साडेतीन मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास सोने वृद्धिंगत होते असे म्हणतात. सध्या सोनं आणि चांदीच्या किमती लाखाच्या घरात असूनही, नागरिकांचा सोने खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. नाणे आणि बार्समध्ये गुंतवणुकीची मागणी वाढली आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांमध्येही उत्सवापूर्वी मागणी वाढताना दिसत आहे. तसेच हलक्या वजनातील आणि डिझायनर प्रकारातील दागिन्यांची मागणी वाढली आहे. दसऱ्याच्या आधीच बुकिंग फुल्ल झाले असल्याचे सराफी व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये विविध वस्तूंच्या खरेदीसाठीही गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. आपट्याची पाने सोनं म्हणून देण्याची परंपरा आहे. त्यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांकडून आपट्याच्या पानांसह, झेंडूच्या फुलांची खरेदी करताना नागरिक दिसत होते. मंदिरांमध्येही सजावट सुरू होती. सायंकाळी घराघरांमध्ये आंब्याच्या पानांची तोरणं लावली जात होती. गोड पदार्थ कोणता करायचा किंवा आणायचा याबाबतही कुटुंबामध्ये चर्चा सुरू होत्या. श्रीखंड, पुरणपोळी, बासुंदी यासारख्या पारंपरिक खाद्यपदार्थांची ऑर्डर मिठाई विक्रेत्यांना दिली जात होती.
दसऱ्याच्या दिवशी सोने किंवा दागिने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यावर्षी हा सण महिन्याच्या सुरुवातीलाच आल्याने, विक्रीत चांगली गती राहील अशी शक्यता आहे. हलक्या वजनाच्या दागिन्यांच्या बुकिंग्सना देखील उत्तम प्रतिसाद आहे, तर जुने सोने बदलून नवीन सोने खरेदी करण्याकडे देखील ग्राहकांचा कल आहे. ज्याचा विक्रीत जवळपास ५० ते ५५ टक्के इतका वाटा आहे. एकूणच, या हंगामाची सुरुवात अत्यंत सकारात्मक वातावरणात होत आहे. - डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स
नवरात्रानंतर सोन्या-चांदीच्या भावामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसांत सोन्याचे भाव तब्बल ८,००० रुपये प्रति दहा ग्रॅमने तर चांदीचे भाव १८ हजार रुपये प्रतिकिलोने वाढले आहेत. दसरा-दिवाळीनंतर आतापर्यंत सोन्या-चांदीच्या दरात जवळपास ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी चांदीचा भाव ९३ हजार रुपये प्रतिकिलो होता, तर सध्या तो १ लाख ४८ हजार रुपये प्रति किलो झाला आहे. त्याचप्रमाणे, सोन्याचा दर गेल्यावर्षी ७६ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम होता, तर आता तो १ लाख १७ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. ग्राहकांकडून या वाढलेल्या दरांनाही उत्तम प्रतिसाद मिळत असून, सोन्या-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. - अमित मोडक, पी.एन.जी. अँड सन्स
“दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने सोन्याला विशेष मागणी आहे. सध्या सोन्याचा दर १,२०,००० रुपये (जीएसटीसह) आहे. विशेषतः वेढणी, नाणे (कॉइन्स) आणि इतर दागिन्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. दसऱ्याच्या आधीच बुकिंग फुल्ल झाले आहे. कमी वजनाचे दागिने आणि वेढणी यांना जास्त मागणी आहे. - फत्तेचंद रांका, रांका ज्वेलर्स
सध्या सोन्याचे दर जास्त असले तरी ग्राहकांचा उत्साह कमी झालेला नाही. हलक्या वजनातील आणि डिझायनर प्रकारातील दागिन्यांना मागणी वाढली आहे. - अतुल अष्टेकर, के.आर. अष्टेकर ज्वेलर्स