पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग : धरणांच्या पातळीत झपाट्याने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 13:20 IST2019-07-03T13:00:22+5:302019-07-03T13:20:18+5:30
मागील चार दिवसांपासून सुरु धरण भागात सुरु असलेल्या पावसामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग : धरणांच्या पातळीत झपाट्याने वाढ
पुणे :मागील चार दिवसांपासून सुरु धरण भागात सुरु असलेल्या पावसामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अक्षरशः पुणेकरांचा घसा कोरडा पडावा इतकी खालावलेली पातळी आता भरायला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांसह पाटबंधारे विभागानेही निःश्वास सोडला आहे.
यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने धरणांची पातळी कमालीची खालावली होती. त्यामुळे पुणे शहरात पाणीकपात करावी लागते की काय अशी शंकाही निर्माण झाली होती. मात्र अखेर पावसाने दमदार एंट्री घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. अवघ्या दोन दिवसात सुमारे १ टीएमसीने पाणीसाठा वाढल्याने बळीराजाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. पावसाच्या अभावी खोळंबल्या पेरण्यांनाही वेग आलेला बघायला मिळतो आहे.
सध्या खडकवासला धरणात ०.६२ टीएमसी (३१.%), पानशेत धरणात २.१६टीएमसी (२०.२८%),वरसगाव धरणात १.२० टीएमसी (९.३८%), आणि टेमघर धरणात ०.०१ टीएमसी (०.१८%) इतका पाणीसाठा आहे. हा एकूण पाणीसाठा ३.९९ टीएमसी इतका असून मागील वर्षीपेक्षा ०.३८ टीएमसीपेक्षा अधिक आहे. एकूणच धरण परिसरात पावसाला सुरुवात झाल्यामुळे पर्यटकांनीही गर्दी केली असून शनिवार-रविवार तर नागरिक हमखास या भागात पर्यटयासाठी येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.