मुलीच्या तेराव्याला जाण्यास डीएसके कुटुंबियांना परवानगी; पोलीस बंदोबस्तात राहावे लागणार उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 18:31 IST2020-08-11T20:49:47+5:302020-08-12T18:31:09+5:30

डीएसके यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.

DSK families allowed to go to the girl's thirteenth programme | मुलीच्या तेराव्याला जाण्यास डीएसके कुटुंबियांना परवानगी; पोलीस बंदोबस्तात राहावे लागणार उपस्थित

मुलीच्या तेराव्याला जाण्यास डीएसके कुटुंबियांना परवानगी; पोलीस बंदोबस्तात राहावे लागणार उपस्थित

ठळक मुद्देतब्बल अडीच वर्षांनंतर डीएसके कुटुंबीय काही तास तुरुंगांबाहेर येणार

पुणे : गुंतवणुदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या येरवडा कारागृहात असलेले बांधकाम व्यवसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या कुटुंबियांना मुलीच्या तेराव्यास उपस्थित राहण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. याबाबत सत्र न्यायाधीश जे.एन. राजे यांनी आदेश दिला आहे. त्यामुळे तब्बल अडीच वर्षांनंतर डीएसके कुटुंबीय काही तास तुरुंगांबाहेर येणार आहेत.
डीएसके यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीला तुरुंगात असल्याने डीएसके यांना उपस्थित राहता आले नव्हते.त्यामुळे तेराव्याला उपस्थित राहण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज डीएसके, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी अ‍ॅड. आशिष पाटणकर आणि अ‍ॅड. प्रतिक राजोपाध्ये यांच्यामार्फत न्यायालयाला केला होता. या अर्जाची सुनावणी होऊन तिघांना १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या तेराव्याच्या कार्यक्रमाला काही तास उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. कारागृहाबाहेर पडल्यापासून पुन्हा कारागृहात येईपर्यंत पोलिसांचे पथक त्यांच्यासोबत असणार आहे. त्यांनी कोरोना विषयक सर्व खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
डीएसके यांच्यावर दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अश्विनी देशपांडे याही आरोपी होत्या. डीएसके यांचे बंधु मकरंद कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. 
उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर १७ फेब्रुवारी २०१८ रोजी पुणेपोलिसांनी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना दिल्ली येथील एका हॉटेलमधून अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी झाली आहे.त्यानंतर ते प्रथमच न्यायालयीन कामकाजाव्यतिरिक्त तुरुंगातून बाहेर येणार आहे.

Web Title: DSK families allowed to go to the girl's thirteenth programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.