तीव्र उतारावरून जाताना चालकाचा ताबा सुटला; वाहन पलटी होऊन ८ जण जखमी, खेड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:28 IST2025-11-08T18:28:18+5:302025-11-08T18:28:52+5:30
या घटनेत आठ मजुरासह चालक जखमी झाला असून दोन ते तीन मजुरांचे हात पाय तुटले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

तीव्र उतारावरून जाताना चालकाचा ताबा सुटला; वाहन पलटी होऊन ८ जण जखमी, खेड तालुक्यातील घटना
पाईट : पाईट येथील श्रीक्षेत्र कुंडेश्वर डोंगरावर जात असताना पिकअप वाहनाचा अपघात झाला होता, यात पाईटच्या पापळवाडी गावातील १२ महिलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी सकाळी खेड तालुक्याचा डोंगराळ भाग पुन्हा एकदा अपघाताच्या घटनेने हादरला. साकुर्डी येथील निर्मळवाडीच्या तीव्र उताराच्या घाट रस्त्यावर एका इमारतीच्या स्लॅबसाठी लोखंडी साहित्य, सिमेंट मिक्सर व मजूर घेऊन निघालेले वाहन पलटी झाले. या घटनेत आठ मजूर जखमी झाले असून त्यातील तीन मजूर गंभीर जखमी आहेत. जखमीना तातडीने चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
साकुर्डी येथील निर्मळवाडीच्या तीव्र डोंगर उतारावर आज सकाळी हा अपघात झाला. हे वाहन वाशेरे मार्गे निर्मळवाडी ते लोहोकरे वस्तीकडे येत होते. एका घराच्या स्लॅबच्या कामासाठी मजूर व लोखंडी साहित्य तसेच मिक्सर घेऊन ते निघाले होते. वाहनात आठ मजूर होते. पाठीमागे सिमेंट मिक्सर जोडला होता. तीव्र उतार उतरत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व वाहन पलटी झाले. पाठीमागील सिमेंट मिक्सरची ट्रॉली त्याला आदळली यात आठ मजुरासह चालक जखमी झाला. यामधील दोन ते तीन मजुरांचे हात पाय तुटले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने हलविण्यासाठी मदत केली. फोनवरून तातडीने रुग्णवाहिका बोलावल्या आहेत. जखमींना सावलीत आणले. पाणी पाजले, धीर दिला. दोन रुग्णवाहिकांमधून जखमींना चांडोलीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.