Maharashtra Rain: वरुणराजाची कृपा! पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद
By श्रीकिशन काळे | Updated: September 15, 2024 18:26 IST2024-09-15T18:18:42+5:302024-09-15T18:26:26+5:30
राज्यामध्ये सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिली असून, उन्हाचा चटका वाढू लागला आहे

Maharashtra Rain: वरुणराजाची कृपा! पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद
पुणे: गेल्या जूनपासून वरुणराजाची पुणे शहर व जिल्ह्यावर कृपा झाली आणि सर्व धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आता सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असून, उद्या मंगळवारी (दि.१७) गणेश विसर्जनाच्या दिवशी पावसाची हजेरी लागणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. केवळ काही भागांत हलक्या सरी येतील, असेही वर्तविण्यात आले आहे. पुण्यात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज दिला होता. तसेच १०६ टक्के पाऊस होईल, असेही सांगितले होते. त्यानुसार पुणे शहरात जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरी ६०५ मिमी पावसाची नोंद होते. पुणे शहरामध्ये जून-जुलै-ऑगस्टमध्ये दरवर्षी ४७२ सरासरी पावसाची नोंद होते. यंदा मात्र ८४२ मिमी पाऊस झाला.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पूर्व भारतात पावसाला पोषक हवामान तयार झाले. राज्यामध्ये पावसाने उघडीप दिली असून, उन्हाचा चटका वाढत आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. ऑक्टोबर हिटचा अनुभव सप्टेंबर महिन्यातच येत आहे.
उत्तर प्रदेश आणि परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरात बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) घोंघावू लागली आहे. ही प्रणाली मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगडकडे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून, हिस्सार, दिल्ली, शाहजहानपूर, बाराबंकी, मुझफ्फरपूर, वादळी प्रणालीचे केंद्र ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय होता.
पुणे शहरातील पाऊस
जून-जुलै-ऑगस्ट सरासरी : ४७२ मिमी
जून-जुलै-ऑगस्ट प्रत्यक्षात : ८४२ मिमी
प्रत्यक्षातील पावसाची टक्केवारी : १७८ टक्के
पुणे जिल्ह्यातील पाऊस
जून-जुलै-ऑगस्ट सरासरी : ७०५ मिमी
जून-जुलै-ऑगस्ट प्रत्यक्षात : ९१७ मिमी
प्रत्यक्षातील पावसाची टक्केवारी : १३० मिमी