समीर पाटीलांविरुद्ध कोणतेही बदनामीकारक विधान करू नका; न्यायालयाचा धंगेकरांना दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 10:56 IST2025-11-13T10:55:58+5:302025-11-13T10:56:27+5:30
समीर पाटील यांचा अर्ज निकाली निघेपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत समीर पाटील यांच्या विरोधात वक्तव्य करण्याबाबत धंगेकर यांच्यावर न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे

समीर पाटीलांविरुद्ध कोणतेही बदनामीकारक विधान करू नका; न्यायालयाचा धंगेकरांना दणका
पुणे: व्यावसायिक समीर पाटील यांच्याविरुद्ध कोणतेही बदनामीकारक विधान किंवा टिप्पणी करू नका असे सूचित करीत दिवाणी न्यायालयाने रवींद्र धंगेकर यांना दणका दिला आहे. समीर पाटील यांचा अर्ज निकाली निघेपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत समीर पाटील यांच्या विरोधात वक्तव्य करण्याबाबत धंगेकर यांच्यावर न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे. दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश (वरिष्ठ स्तर ) के. आर. सिंघेल यांनी हा आदेश दिला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांचे निकटवर्तीय असलेले समीर पाटील यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे समीर पाटील यांनी धंगेकर यांच्याविरुद्ध कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या दाव्यावर सुनावणी होताना धंगेकरांना न्यायालयाने सूचना दिल्या आहेत.
नीलेश घायवळचे आणि चंद्रकांत पाटील यांचे जवळचे संबंध असून, त्यांच्याच पाठबळामुळे घायवळ गँग पुण्यात दहशत माजवत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. तसेच, या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या समीर पाटील यांच्यावरही धंगेंकरांनी आरोप केले होते. त्यामुळे, समीर पाटील आणि धंगेकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. ही लढाई आता न्यायालयात पोहोचली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात बोलताना धंगेकर यांनी समीर पाटील यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याचा आणि त्यांचा गुंडांशी साटेलोटे असल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी पुरावे म्हणून काही फोटो आणि माहिती समोर आणली होती. मात्र, या आरोपांचा कोणताही ठोस संदर्भ किंवा पुरावा नसल्याचा दावा करत समीर पाटील यांनी धंगेकरांचे आरोप हे राजकीय स्वार्थापोटी केल्याचे सांगितले होते. तसेच धंगेकर यांच्या या टीकेमुळे समीर पाटील यांच्या व्यवसायिक प्रतिमेला आणि वैयक्तिक आयुष्यात मोठा धक्का बसला असल्याचे त्यांनी सांगितले होते.