पुणे रेल्वे स्थानकावर गडबड नको, तुमच्यावर अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’ची नजर, महत्त्वाच्या ठिकाणी हायटेक कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:29 IST2026-02-24T12:28:29+5:302026-02-24T12:29:04+5:30

चोरी, पाकीटमारी तसेच अपहरणासारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर १६० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत

Don't make a fuss at Pune Railway Station, you will be watched by state-of-the-art CCTV, high-tech cameras at important locations | पुणे रेल्वे स्थानकावर गडबड नको, तुमच्यावर अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’ची नजर, महत्त्वाच्या ठिकाणी हायटेक कॅमेरे

पुणे रेल्वे स्थानकावर गडबड नको, तुमच्यावर अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’ची नजर, महत्त्वाच्या ठिकाणी हायटेक कॅमेरे

पुणे : पुणे रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक १६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा भक्कम झाली आहे. हायटेक कॅमेरे असल्याने बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ झाली आहे.

मध्य रेल्वे विभागातील पुणे रेल्वेस्थानक महत्त्वाचे आहे. या ठिकाणावरून देशातील सर्व भागात रेल्वे गाड्या धावतात. यामुळे दररोज मोठ्या संख्येने गाड्यांची ये-जा होत असते. दैनंदिन जवळपास दीड लाखाहून अधिक प्रवासी येथून प्रवास करतात. प्रवाशांची वर्दळ आणि वाढती गर्दी लक्षात घेता स्थानकावर अधिक सक्षम सुरक्षा यंत्रणेची गरज भासत होती. यापूर्वी बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची संख्या अपुरी पडत होती. चोरी, पाकीटमारी तसेच अपहरणासारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा वाढविण्याची मागणी सातत्याने होत होती. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनामार्फत पाठविण्यात आल्यानंतर रेल्वे बोर्डाने त्यास मंजुरी देत निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार १६० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. काही तांत्रिक कारणांमुळे या कामाला वेळ लागला; मात्र अखेर फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाला आहे. आता स्थानक परिसरातील सर्व प्लॅटफॉर्म, प्रवेशद्वार, तिकीट खिडक्या, पार्किंग परिसर आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. त्याचा फायदा प्रवासी आणि रेल्वे प्रशासनास होणार आहे.

‘स्मार्ट’ कॅमेऱ्यांचाही समावेश 

स्टेशनवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही ‘स्मार्ट’ कॅमेऱ्यांचाही समावेश केला असून, संशयास्पद हालचाली ओळखणे, सराईत गुन्हेगारांची ओळख पटविणे आणि त्यांच्यावर तत्काळ कारवाई करणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे पाकीटमारांसह छोट्या-मोठ्या गुन्ह्यांवर प्रभावी आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या नव्या सुरक्षा व्यवस्थेमुळे पुणे रेल्वेस्थानकावरील प्रवासी व रेल्वे मालमत्ता अधिक सुरक्षित झाली असून, रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

अत्याधुनिक नियंत्रण कक्ष 

नवीन कॅमेऱ्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दलासाठी स्वतंत्र व अत्याधुनिक नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. मोठ्या एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून २४ तास संपूर्ण स्थानकावर लक्ष ठेवले जात आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य झाले आहे.

नव्याने बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमुळे संपूर्ण रेल्वेस्थानकासह आजूबाजूचा परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत आला आहे. अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आल्याने प्रवाशांची सुरक्षा भक्कम झाली आहे. त्यामुळे सुरक्षितता वाढली आहे. -हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग

अशी आहे आकडेवारी 

-नव्याने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींची संख्या - १६०
-पुणे रेल्वेस्थानकावरील दैनंदिन प्रवासी संख्या - दीड लाख
-पुणे रेल्वेस्थानकावरून धावणाऱ्या दैनंदिन गाड्या - १८०

Web Title : पुणे रेलवे स्टेशन पर सुरक्षा बढ़ी: 160 सीसीटीवी कैमरे लगे

Web Summary : पुणे रेलवे स्टेशन पर 160 नए सीसीटीवी कैमरों से सुरक्षा बढ़ाई गई है। ये हाई-टेक कैमरे प्लेटफॉर्म, प्रवेश द्वार और पार्किंग क्षेत्रों पर नजर रखेंगे, जिससे यात्रियों की सुरक्षा बढ़ेगी और अपराध रोकने में मदद मिलेगी। रेलवे ने निरंतर निगरानी के लिए एक आधुनिक नियंत्रण कक्ष भी स्थापित किया है।

Web Title : Pune Railway Station Enhanced Security: 160 CCTV Cameras Installed

Web Summary : Pune Railway Station boosts security with 160 new CCTV cameras. These high-tech cameras will monitor platforms, entrances, and parking areas, enhancing passenger safety and helping to prevent crime. The railway has also established a modern control room for constant surveillance.