'तुमच्या कुत्र्याला रस्त्यावर घाण करू देऊ नका', किरकोळ वादातून २ कुटुंबात जोरदार हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 14:04 IST2021-10-04T14:02:29+5:302021-10-04T14:04:00+5:30

परस्पराविरोधात विनयभंगाच्या तक्रारी करणाऱ्या १२ जणांना अटक

don't let your dog get dirty on the street two families fight over a minor dispute | 'तुमच्या कुत्र्याला रस्त्यावर घाण करू देऊ नका', किरकोळ वादातून २ कुटुंबात जोरदार हाणामारी

'तुमच्या कुत्र्याला रस्त्यावर घाण करू देऊ नका', किरकोळ वादातून २ कुटुंबात जोरदार हाणामारी

ठळक मुद्देकुत्रे पाळण्याच्या लोकांच्या हौसेचा इतरांना होतोय मनस्ताप

पुणे : लोकांचे प्राणीप्रेम सध्या वाढले आहे. मात्र, कुत्रे पाळण्याच्या लोकांच्या हौसेचा इतरांना मात्र मनस्ताप होतो. सकाळ संध्याकाळ, रात्री या प्राण्यांनी घरात घाण करुन नये, म्हणून त्यांना बाहेर फिरायला घेऊन जातात. ही कुत्री रस्त्यावर घाण करुन ठेवतात. या कारणावरुन लोहगावात दोन कुटुंबामध्ये सार्वजनिक रोडवर शनिवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. दोघांनीही परस्पराविरुद्ध विनयभंगाच्या तक्रारी दिल्या. पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील १२ जणांना अटक केली आहे. हा प्रकार भुकण वस्तीतील गुरुद्वारा कॉलनीतील सार्वजनिक रोडवर २ ऑक्टोंबरला रात्री साडेनऊ वाजता घडला.

याप्रकरणी एका ५५ वर्षाच्या गृहस्थाने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या कॉलनीतील एका महिला रात्री त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना तुमच्या पाळीव कुत्र्याला घाण करायला बसवू नका, असे सांगितले. त्यावरुन या महिलेच्या कुटुंबातील ७ जण दुचाकीवरुन आले. त्यांनी लाकडी बांबुने फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली. यावेळी फिर्यादी यांच्या पत्नीचे साडीला पकडून त्यांचे केसाला धरुन खाली पाडुन अश्लिल शिवीगाळ केली. विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन महिलांसह ७ जणांना अटक केली आहे.

त्याविरोधात एका २४ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या त्यांच्या पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन गेल्या होता. त्यावेळी तेथेच राहणाऱ्या  आरोपीने फिर्यादी यांच्या कुत्र्यास दगड मारला. फिर्यादी यांनी त्याला जाब विचारल्यावर त्याने अश्लिल शिवीगाळ करुन फिर्यादीचा हात धरुन पिरगळला. फिर्यादीची आई जाब विचारण्यासाठी गेल्या असताना सर्वानी मिळून फिर्यादी व त्यांच्या आईला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विमानतळ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन ५ जणांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाठक अधिक तपास करीत आहेत.

Web Title: don't let your dog get dirty on the street two families fight over a minor dispute