गुंतवणुकीच्या अमिषाला बळी पडू नका; सर्वसामान्यांची होतीये फसवणूक, पुण्यात तिघांना १ कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 16:39 IST2026-03-05T16:39:19+5:302026-03-05T16:39:37+5:30
सायबर चोरांकडून शेअर मार्केट, फिरण्याचे आणि गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे

गुंतवणुकीच्या अमिषाला बळी पडू नका; सर्वसामान्यांची होतीये फसवणूक, पुण्यात तिघांना १ कोटींचा गंडा
पुणे : सायबर चोरांकडून दररोज वेगवेगळ्या कारणांनी सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. अशाच एका घटनेसह अन्य दोघांची १ कोटी ३५ लाख ७५ हजार ३९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, स्टॉक ट्रेडिंगच्या नावाखाली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या माध्यमातून आंबेगाव खूर्द येथील एकाची १ कोटी ३ लाख १८ हजार ५३९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ७ ऑक्टोबर ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, एका ट्रॅव्हल एजन्सीमार्फत सिंगापूर फिरण्यासाठी घेऊन जाण्याचे सांगत तिकीट, व्हिसा काढण्यासाठी वेगवेगळे आमिष दाखवून धनकवडी परिसरातील ६१ वर्षीय ज्येष्ठाची १ लाख ७२ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मयुरेश नामदेव वाघ या जळगाव येथील शौर्य यात्रा कंपनीच्या संचालकाविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ९ एप्रिल २०२५ ते २६ जुलै २०२५ या कालावधीत घडला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोरे हे करत आहेत.
तिसऱ्या घटनेत, एनसीसी मेट्रो प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यावर कोणताही परतावा अथवा मुद्दत न देता फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उंड्री येथील एका ४० वर्षीय तक्रारदाराने ३० लाख ८४ हजारांची फसवणूक झाल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ ऑक्टोबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ या कालावधीत घडला आहे. यावरून पोलिसांनी हिंगोली येथील वैभव सुनील देशपांडे (३०) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश लामखडे करत आहेत.