घरगुती भांडण; अंगावर धावून आलेल्या चुलत भावाला बाल्कनीतून ढकलले; तरुणाचा मृत्यू

By नितीश गोवंडे | Updated: February 17, 2025 16:16 IST2025-02-17T16:13:02+5:302025-02-17T16:16:35+5:30

भाऊ बाल्कनीतून खाली पडल्यावर आरोपी घरात बसून राहिला, या प्रकरणात कोणीही वाच्यता न करता घटना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता

Domestic dispute; Cousin who rushed at him pushed him from the balcony; Young man dies | घरगुती भांडण; अंगावर धावून आलेल्या चुलत भावाला बाल्कनीतून ढकलले; तरुणाचा मृत्यू

घरगुती भांडण; अंगावर धावून आलेल्या चुलत भावाला बाल्कनीतून ढकलले; तरुणाचा मृत्यू

पुणे: घरगुती भांडणात अंगावर धावून आलेल्या चुलत भावाला ढकलून दिल्यामुळे बाल्कनीतून पडून त्याचा मृत्यू झाला. मात्र, कोणीही वाच्यता न करता घटना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दुसऱ्या दिवशी घटनेची चौकशी करत चुलत भावाला अटक केली आहे. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास धायरीत घडली होती.

अमर किसन देशमुख (३५, रा. कपिल अपार्टमेंट, मतेनगर, धायरीगाव) असे मृताचे नाव आहे. राजू भुरेलाल देशमुख (रा. कपिल अपार्टमेंट, मतेनगर, धायरीगाव) असे आरोपी चुलत भावाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मोहपत हरिराम साहारे (३६, रा. धायरीगाव) यांनी नांदेडसिटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर आणि चुलत भाऊ राजू इतर दोघेही मूळ मध्य प्रदेशातील आहे. ते एका सोनपापडीच्या कारखान्यात काम करतात. राजू व अमर यांच्यामध्ये पत्नीबाबत बोलण्यावरून भांडण झाल्यामुळे अमर राजूच्या अंगावर धावला. त्यावेळी राजूने अमरला ढकलून दिल्याने तो बाल्कनीतून खाली पडला. त्याला कोणतीही मदत न करता राजू घरात बसून राहिला. हा सर्व प्रकार साहारेने पाहिला असतानाही तो तेथून निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अमरचा मृत्यू झाल्याचे समजले तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. तेव्हा राजूने घडलेला प्रकार सांगितला. मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल राजू देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे तपास करत आहेत.

Web Title: Domestic dispute; Cousin who rushed at him pushed him from the balcony; Young man dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.