मातंग समाजाच्या अस्मितेवर घाव घालू नका; मातंग समाजाचा पुणे महापालिकेवर आक्रोश मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 19:59 IST2021-07-13T19:57:26+5:302021-07-13T19:59:58+5:30
मातंग समाजाच्या अस्मितांवर आघात करण्याचे काम पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून सुरु आहे.

मातंग समाजाच्या अस्मितेवर घाव घालू नका; मातंग समाजाचा पुणे महापालिकेवर आक्रोश मोर्चा
पुणे : मातंग समाजाच्या अस्मितांवर आघात करण्याचे काम सत्ताधारी भाजपाकडून सुरु आहे. समाजाला वंदनीय असलेल्या लोकशाहीर आण्णा भाऊ साठे आणि लहुजी वस्ताद साळवेंच्या स्मारकांच्या जागांमध्ये समाजोपयोगी उपक्रमांऐवजी भलत्याच गोष्टी उभ्या केल्या जात आहेत. समाजाने या स्मारकांसाठी बराच काळ संघर्ष केला आहे. त्यामुळे आमच्या अस्मितांवर घाव घालू नका असा इशारा मातंग समाजाने दिला आहे.
मातंग समाजाच्या वतीने पुणे महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. बिबवेवाडी येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारकाचे काम समाजाने अनेक वर्ष लढा दिल्यानंतर पूर्ण झाले आहे. या स्मारकात मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह उभारण्याचा ठराव करण्यात आलेला आहे. मात्र, तेथे जलतरण तलाव बांधण्याचा घाट घातला जात आहे. यासोबतच भवानी पेठ येथे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा आहे. या ठिकाणी गरीब व गरजू तरुणांसाठी क्रीडा संकुल उभारण्यात आलेले आहे. यामध्ये व्यायामशाळा, बॉक्सिंग, कराटे, टेनिस, योगासनांसह अन्य क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षणही बंद करण्याचा प्रयत्न पालिकेने सुरु केला आहे.
त्याचा निषेध करण्यासाठी शहरातील मातंग समाजाने पालिके वर मोर्चा काढला होता. या आंदोलनात दलित समाजाच्या विविध संघटना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेनाही सहभागी झाली होती. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, भाजपा सूडबुध्दीने वागत असून मातंग समाजावर अन्याय केला जात आहे. आवश्यकता भासल्यास प्रसंगी न्यायालयामध्ये दाद मागितली जाईल. तसेच शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी आंदोलानला पाठिंबा देत असल्याचे सांगितले. तर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, बहुजन समाजाला सातत्याने भाजपाकडून मागे खेचण्याचे काम केले जात असून भाजपाला त्यांच्या भूमिकेची किंमत चुकवावी लागेल असे म्हणाले.
समाजाच्या शिष्टमंडळाने यावेळी महापालिका आयुक्त यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महापालिकेच्या वतीने काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करून पूर्तता केली जाईल. तसेच समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले.
या आंदोलनात विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, लहुजी समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल हातागळे, भीम आर्मीचे अध्यक्ष दत्ता पोळ, नगरसेवक अविनाश बागवे, हाजी गफुर पठाण, महेंद्र कांबळे, श्याम गायकवाड, बसवराज गायकवाड, सचिन बगाडे, सचिन जोगदंड, संजय आल्हाट आदी उपस्थित होते.