पुण्यातील सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रमाला गालबोट; २ गटांमध्ये किरकोळ कारणांवरून शिवीगाळ, मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 13:14 IST2025-10-22T13:13:15+5:302025-10-22T13:14:15+5:30
हिंदुत्त्ववादी संघटनांनी धमक्या दिल्यामुळे चर्चेत असलेल्या सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रम यंदा पार पडला, मात्र किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने कार्यक्रमाला अखेर गालबोट लागले

पुण्यातील सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रमाला गालबोट; २ गटांमध्ये किरकोळ कारणांवरून शिवीगाळ, मारहाण
पुणे: पुण्यातील सारसबागेत आज दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान धक्का लागल्यामुळे दोन गटात किरकोळ वाद झाला. पोलिसांच्या मध्यस्थीने वाद शमला. चार ते पाच जणांकडून एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. दरम्यान यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
पुण्यात दरवर्षी दिवाळी पहाटला सारसबागेत मोठ्या संख्येने तरुण- तरुणी येत असतात. पारंपरिक वेशभूषा धारण करून सर्वजण या दिवाळी पहाटला सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. मात्र यंदा याठिकाणी अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे. २ गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याचे दिसते आहे. एका तरुणाला ४,५ जण मारहाण आणि शिवीगाळ करताना व्हिडिओ मधून दिसत आहे. पोलीस मध्यस्थी करूनही ते वाद वाढवताना दिसत आहेत. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. परंतु काही वेळाने हा वाद थांबला आहे.
हिंदुत्त्ववादी संघटनांनी धमक्या दिल्यामुळे चर्चेत असलेल्या पुण्यातील सारसबाग दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम यंदा पार पडला, मात्र किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने पहाट कार्यक्रमाला अखेर गालबोट लागले. यंदा सारसबागेत होणाऱ्या या पाडवा पहाट कार्यक्रमाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. या धमक्यांमुळे आयोजकांनी पाडवा पहाटेचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुणेपोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर आयोजकांनी हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज पहाटेपासून सारसबागेच्या परिसरात कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.