Diwali 2025 : दिवाळीत मिठाईऐवजी आरोग्यदायी सुकामेव्याला मागणी जास्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:04 IST2025-10-11T10:03:33+5:302025-10-11T10:04:51+5:30
मधुमेह किंवा वजन नियंत्रणाबद्दल जागरूक लोक पारंपरिक मिठाईला पर्याय म्हणून शुगर-फ्री आणि पौष्टिक सुकामेव्याला प्राधान्य देत आहेत.

Diwali 2025 : दिवाळीत मिठाईऐवजी आरोग्यदायी सुकामेव्याला मागणी जास्त
पुणे : प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीत नातेवाइकांना आणि मित्रमंडळींना मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या जातात. मात्र यंदा नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढल्याने मिठाईऐवजी सुकामेव्याला (ड्रायफ्रुट्स) पसंती दिली जात आहे. मागील वर्षापेक्षा यंदा ती अधिक आहे. त्यामुळे यंदा मार्केट यार्ड बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. मधुमेह किंवा वजन नियंत्रणाबद्दल जागरूक लोक पारंपरिक मिठाईला पर्याय म्हणून शुगर-फ्री आणि पौष्टिक सुकामेव्याला प्राधान्य देत आहेत.
७ टक्क्यांनी घसरण झाल्याचा परिणाम
केंद्र सरकारने अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी कर कमी केल्याने यंदा सुकामेव्याच्या दरात थेट १२ टक्के जीएसटीवरून ५ टक्के जीएसटी कमी केल्याने बदाम, अंजीर, पिस्ता यांच्या मागणीमुळे दरात ७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि अंजीर यांसारख्या सुकामेव्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे.
प्रकार पूर्वीचे दर जीएसटी कमी करून दर
खजूर ३३६ ....... ३१५
बदाम ८९६..... ८४०
काजू ८००.... ८००
पिस्ता १२५०.... ११५०
आक्रोड १२५०....११५०
अंजीर १५००... १३००
खारीक २८०... २५०
जर्दाळू ५००...४००
कॉर्पोरेट भेटवस्तूमध्ये सुकामेवा देण्याचा ट्रेंड
दिवाळीमध्ये कॉर्पोरेट कंपन्या, व्यावसायिक आणि नागरिक त्यांच्या कर्मचारी, नातेवाईक आणि मित्रमंडळींना भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंगमधील सुकामेवा गिफ्ट बॉक्स मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यात पौष्टिक सुकामेवा हॅम्पर्सला पसंती दिली जात आहे.
कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सुकामेवा भेटवस्तूंचा ट्रेंड वाढला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दिवाळीत त्याला मागणी वाढली आहे. यंदा मात्र केंद्र सरकारने १२ टक्क्यांवरून ५ टक्के जीएसटी केल्याने सुकामेव्याच्या दरात घट झाली आहे. यामुळे सामन्यांकडून मागणी वाढली असून दिवाळीमध्ये त्यांची दिवाळी गोड होणार आहे. - नवीन गोयल, सुकामेव्याचे व्यापारी