Suicide: घटस्फोटीत पती अन् प्रियकराच्या लग्नाच्या तगाद्याने महिलेनं गळफास घेऊन संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 13:54 IST2021-09-27T13:50:05+5:302021-09-27T13:54:32+5:30
पती आणि प्रियकर यांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाने उचललं टोकाचं पाऊल

Suicide: घटस्फोटीत पती अन् प्रियकराच्या लग्नाच्या तगाद्याने महिलेनं गळफास घेऊन संपवलं जीवन
पुणे : घटस्फोट घेतल्यानंतरही पुन्हा लग्न करण्यासाठी घटस्फोटीत पतीचा प्रयत्न तर प्रेमसंबंधानंतर लग्नासाठी प्रियकर देत असलेला मानसिक त्रास या दोघांच्या त्रासामुळे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सोहम राजू गागडे (रा. इचलकंरजी, जि. कोल्हापूर) आणि गिरीश प्रविण मछले (रा. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अर्पणा अभंगे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.ही घटना येरवड्यातील कंजारभाटनगर येथे २५ ऑगस्ट रोजी घडली होती.
याप्रकरणी अर्पणाची आई जयश्री अभंगे (वय ४०, रा. कंजारभाटनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अर्पणा हिचे सोहम गागडे याच्याबरोबर विवाह झाला होता. त्याने शारीरीक व मानसिक छळ केल्याने अर्पणा हिने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिचे गिरीश मछले याच्याबरोबर प्रेमसंबंध जुळले.
प्रेमसंबंधातून ते दोघे लग्न करणार होते. त्याचवेळी तिचा पहिला पती सोहम हाही अर्पणासोबत पुन्हा लग्न करुन संसार करणार होता. दोघांनी लग्नासाठी खूप मानसिक त्रास दिल्याने अर्पणा हिने २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. तपासात दोघांच्या त्रासामुळे तिने गळफास घेतल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आळेकर तपास करीत आहेत.