पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू; पैसे घेण्यासाठी गर्दी करू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 19:28 IST2020-04-15T16:43:59+5:302020-04-15T19:28:55+5:30
लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांची कोणतीही अडचण होऊ नये यासाठी जिल्हा बँकेने घेतला पुढाकार

पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू; पैसे घेण्यासाठी गर्दी करू नका
पुणे: सध्या राज्यासह संपूर्ण देशावर कोरोना विषाणूचे ढग गड्द होत असताना ग्रामीण भागात शेतक-यांची आगामी खरीप हंगामाची जोरदार पूर्व तयारी सुरू आहे. यासाठीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप सुरू केले आहे. पीक कर्जाचे वाटप सुरू झाले असले तरी नागरिकांना कर्जाचे पैसे घेण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा बँक प्रशासनाने केले आहे.
कोरोना मुळे सध्या तब्बल 3 मे पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. यामुळे सर्व व्यवहार, उद्योग धंदे ठप्प आहेत. परंतु ग्रामीण भागात या सुट्टीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करण्यामध्ये व्यस्त आहे. तसेच घरगुती बी-बीयाणे गोळा करण्याची कामे सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांची कोणतीही अडचण होऊ नये यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला असून, शेतकरी वर्गाला पीक कर्जाचे वाटप सुरू केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी गतवषीर्चे कर्ज 31 मार्च पूर्वी परतफेड केले आहे, त्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जाचे वाटप सुरू केले आहे.
दरम्यान सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढत असताना नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड केली आहे, असे शेतकरी पुन्हा खरिपात कर्ज घेण्यासाठी तयारी करतात. यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन संबंधित शाखांमध्ये पीक कर्जाची प्रक्रिया करून कर्ज घ्यावे.
यंदा खरीप आणि रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकना पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या २६६ हून अधिक शाखांमार्फत गाव पातळीवरील सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना दिला. बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कजार्चे वाटप केले आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप केले. गेल्या वर्षी खरिपात एक लाख ४८ हजार ३६६ शेतकऱ्यांना एक हजार १२८ कोटी ४२ लाख ४ हजार, तर रब्बीत ४३ हजार ३१७ शेतकऱ्यांना २४० कोटी ३३ लाख ६९ हजार रुपयांचे वाटप केले होते.