Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:42 IST2025-04-19T17:41:57+5:302025-04-19T17:42:49+5:30
- नुकताच मंगेशकर रुग्णालय प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल समोर आला

Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती रुग्ण तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात रुग्णालयातील प्रमुख स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर 106(1) अंतर्गत अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या फेरचौकशी अहवालात त्यांच्या वैद्यकीय हलगर्जीपणाची स्पष्ट नोंद झाली असून, त्यावरून ही कारवाई झाली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, नुकताच मंगेशकर रुग्णालय प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल समोर आला आहे. ससूनच्या दुसऱ्या अहवालात डॉ. घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आले आहे. ससुन समितीचा दुसरा अहवालानुसार डॉ घैसास यांच्यावर 106(1) नुसार अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार,'ससून प्रशासनाला जे चार प्रश्न पोलिसांनी उपस्थित केलेले होते त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये डॉक्टरांची मेडिकल निगलिजन्सी असल्याचे म्हटले आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'
तर संभाजी कदम,पोलिस उपायुक्त यांनी दिलेली माहितीनुसार, ससून हॉस्पिटलकडून परत अहवाल मागितला. यानुसार डॉ घैसास यांनी निष्काळजीपण आणि हलगर्जीपणा दाखवला वेळ घालवला त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. बी जे मेडिकल कॉलेज याच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ण चौकशी करून अहवाल दिला होता त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास कायदेशीरित्या केला जाईल. ही कारवाई शासन जी आर नुसार करण्यात आली आहे. डॉ घैसास याचा रोल यात दिसत आहे त्यानुसार कारवाई केली आहे. डॉ घैसास यांच्यावर स्टेटमेंट घेतला जाईल,जबाब घेतला जाईल. त्यानंतर त्याची माहिती दिली जाईल.
दरम्यान, तनिषा भिसे या ७ महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना पोटात तीव्र वेदना व उच्च रक्तदाब जाणवू लागल्याने २१ मार्च २०२५ रोजी इंदिरा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. पुढील उपचारांसाठी २८ मार्च रोजी त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडे त्यांनी पूर्वी उपचार घेतले असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून तिथे हलविण्यात आले. मात्र, गंभीर अवस्थेत असूनही रुग्णालयात ५ तास ३० मिनिटांपर्यंत कोणतेही तात्काळ उपचार करण्यात आले नाहीत, असा गंभीर आरोप नातेवाइकांनी केला आहे.
रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्याऐवजी १० लाख रुपये एनआयसीयू डिपॉझिट भरल्याशिवाय दाखल करून घेतले जाणार नाही, असा अडसर निर्माण करण्यात आल्याचे पीडित कुटुंबाने स्पष्ट केले आहे. या विलंबामुळेच रुग्णाची अवस्था अधिक बिघडली आणि अखेर ३१ मार्च रोजी मणिपाल रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
ससून रुग्णालयाने दिलेल्या फेरचौकशी अहवालातही डॉ. घैसास यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णावर वेळेत उपचार झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. परिणामी त्यांच्या मृत्यूला डॉ. घैसास यांची वैद्यकीय निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, संबंधित रुग्णालयावरही चौकशीची मागणी होत आहे. दरम्यान, मयत रुग्णाच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.